Share Market Update: शुक्रवारपासून शेअर बाजारात होणार मोठा बदल! गुंतवणूकदार होणार मोठा फायदा

Share Market T Plus 1: शेअर बाजारामधील या बदलाची टप्प्याटप्प्यातील सुरुवात मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून सुरु झाली होती आणि आता ही नवीन पद्धत पूर्णपणे लागू करण्यात येणार आहे.

Updated: Jan 26, 2023, 07:20 PM IST
Share Market Update: शुक्रवारपासून शेअर बाजारात होणार मोठा बदल! गुंतवणूकदार होणार मोठा फायदा title=
share market update

Share Market Update T Plus 1 Payment: शेअर बाजारात (Share Market) शुक्रवारी म्हणजेच उद्यापासून (27 जानेवारी 2023) मोठा बदल होणार आहे. घरगुती शेअर बाजारामध्ये शुक्रवारपासून एक नवीन पर्व सुरु होत आहे. नव्या नियमानुसार लिस्टेड कंपन्यांच्या (Listed Companies) शेअर्सच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील व्यवहार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच (टी प्लस वन) (T Plus 1) ते पूर्ण केले जातील. यामुळे ग्राहकांसाठी मार्जिनची आवश्यकता राहणार नाही आणि त्यांच्याकडील कॅश वाढणार आहे. त्यामुळे सर्वसाधारण गुंतवणूक वाढणार आहे.

'टी प्लस वन' म्हणजे काय?

'टी प्लस वन' म्हणजेच ट्रेड प्लस वनमध्ये बाजारपेठेतील व्यापारासंदर्भातील व्यवहार हे सौदा झाल्याच्या एक दिवसानंतर पूर्ण केले जातात. आतापर्यंत हा कालावधी दोन दिवसांचा होता. म्हणजेच आज सौदा करण्याचं निश्चित केल्यानंतर अंतिम देवाण-घेवाण करण्यासाठी किमान दोन दिवसांचा कालावधी लागायचा. याला 'टी प्लस टू' असं म्हटलं जातं. 

मागील वर्षापासूनच झाली सुरुवात

शेअर बाजारातील नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बीएसईने नोव्हेंबर 2021 मध्ये संयुक्तपणे जारी केलेल्या पत्रकामध्ये असं म्हटलं होतं की टप्प्याटप्प्यानुसार 'टी प्लस वन' सेवा सुरु केली जाईल. याची सुरुवात 25 फेब्रुवारी 2022 पासून करण्यात आली होती. सुरुवातीला बाजारपेठेतील मुल्यानुसार तळाच्या 100 कंपन्या या पद्धतीच्या व्यवहारांमध्ये सहभागी झाल्या. त्यानंतर नोंदणीकृत मापदंडांच्या आदारावर 500 शेअर्स कंपन्यांना मार्चच्या शेवटच्या शुक्रवारी यामध्ये सहभागी करुन घेण्यात आलं. त्यानंतर दर महिन्याला काही ठराविक कंपन्यांचा समावेश करत करत हा आवाका वाढवण्यात आला.

हे व्यवहारही 'टी प्लस वन'मध्ये

घरगुती बाजारामध्ये 27 जानेवारीपासून इक्विटी कॅश सेगमेंटमधील सर्व व्यवहार आता 'टी प्लस वन' आधारावर होणार आहेत. म्हणजेच आज खरेदी विक्री झाली की दुसऱ्या दिवशी खात्यावर पैसे जमा होतील. शेअर ब्रोकर कंपनी झीरोदा वेबसाईटवरील माहितीनुसार शेअर, ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड), बॉण्ड, रिअल इस्टेट निवेश ट्रस्ट (रीट) आणि इनविटचे व्यवहारही 'टी प्लस वन' तत्वानुसार केले जाणार आहेत. अगदी शेअर्सच्या देवाण-घेवाणीसंदर्भात अ‍ॅपवरुन होणाऱ्या सर्व व्यवहारांसाठीही हा नवीन नियम लागू होणार आहे.

यापूर्वी 2003 मध्ये केलेला बदल

अशाप्रकारे पहिल्यांदाच 'सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया'ने (SEBI) एका दिवसामध्ये व्यवहार पूर्ण करण्याच्या उद्देशाने मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 2002 मध्ये बाजारातील व्यवहार पूर्ण करण्यासाठी 'टी प्लस फाइव्ह' वरुन 'टी प्लस थ्री' पद्धत लागू करम्यात आळी होती. त्यानंतर 2003 मध्ये यात बदल करुन 'टी प्लस टू' पद्धत वापरात आणली गेली. 

तज्ज्ञांचं म्हणणं काय?

मार्केट तज्ज्ञांच्या मते 'टी प्लस वन' व्यवस्थेमुळे प्रत्यक्षात पैसा गुंतवणूकदारांच्या हाती येण्यासाठी अतिरिक्त एका दिवसाची वाट पहावी लागणार नाही. म्हणजेच कोणत्याही माध्यमातून शेअर बाजारामध्ये आज खरेदी विक्रीचा व्यवहार केल्यास दुसऱ्याच दिवशी पैसे खात्यावर जमा होतील.

भारत अमेरिकेच्याही पुढे

अपसाइड एआयचे सहसंस्थापक अतनु अग्रवाल यांनी जगभरामध्ये बहुतेक बाजार हे 'टी प्लस टू' नुसार काम करतात. 'टी प्लस वन'नुसार व्यवहार सुरु झाल्यावर भारत याबाबतीत अमेरिकेच्याही पुढे निघून जाईल.

गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक बाब

हा एक महत्त्वपूर्ण निर्णय असून भारतीय शेअर मार्केटसाठी महत्त्वाचं पाऊल आहे. या बदलामुळे नक्कीच नगद व्यवहारांमध्ये आणि सर्वसामान्य गुंतवणुकीमध्ये वाढ होईल अशी तज्ज्ञांना अपेक्षा आहे. ही सर्वांसाठी समाधानाची बाब आहे.