कोलकाता : अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आसनसोल पोटनिवडणुकीत (Loksabha by-Election) विजय मिळवला आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) च्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून पोटनिवडणुकीत 2 लाखांहून अधिक मतांच्या फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. आसनसोल लोकसभा मतदारसंघात टीएमसीने विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांनी भाजपच्या उमेदवार अग्निमित्रा पॉल (Agnimitra Paul) यांचा पराभव केला आहे.
2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बाबुल सुप्रियो भाजपच्या तिकिटावर विजयी झाले होते. यापूर्वी ही जागा माकपकडे होती. त्यामुळे तृणमूल काँग्रेसने पहिल्यांदाच या मतदारसंघात विजय मिळवला आहे.
विजयानंतर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, 'विजयाचं श्रेय ममता बॅनर्जी आणि जनतेला जाते. तसेच तृणमूल काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांना जातं.'
ते म्हणाले की, ममता बॅनर्जींच्या सूचना आणि आसनसोलच्या जनतेचा आदेश अध्यादेश म्हणून घेऊन मी येथे आलो आणि आता या लोकांच्या प्रेमापुढे नतमस्तक होतो. मी ममता बॅनर्जींसाठी माझ्यापेक्षा जास्त आनंदी आहे.
हा ऐतिहासिक विजय असल्याचे सांगत ते म्हणाले की, ममता बॅनर्जी पात्र असूनही आजपर्यंत का पक्षाला ही जागा जिंकता आली नाही, हे मला माहीत नाही. आता असे वाटते की आपण योग्य मार्गावर आलो आहोत, योग्य वेळी आलो आहोत. आता आपण योग्य मार्गाने पुढे जाऊ.
शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात भाजपने बॉलिवूडमधील फॅशन डिझायनर अग्निमित्रा पॉल यांना मैदानात उतरवले होते. मागील वर्षी विधानसभा निवडणुकीत असनसोल दक्षिण मतदारसंघातून त्यांनी तृणमूलच्या सयानी घोष यांचा पराभव केला होता. आता भाजपने त्यांना लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मैदानात उतरवले होते.