हुंड्यासाठी विवाहितेची उपासमार; शेवटच्या घटका मोजताना तिचं वजन फक्त २० किलो

पती- सासूकडून विवाहितेची उपासमार   

Updated: Mar 31, 2019, 11:36 AM IST
हुंड्यासाठी विवाहितेची उपासमार; शेवटच्या घटका मोजताना तिचं वजन फक्त २० किलो title=

कोल्लम : सासू आणि पतीकडून होणारा जाच आणि उपासमार यामुळे केरळमध्ये एका विवाहितेचा अत्यंत करुण अंत झाला आहे. वयाच्या २७ व्या वर्षी तिने प्राण सोडले असून, अखेरच्या क्षणी तिचं वजन अवघं २० किलो इतकंच होतं. हुंड्याची मागणी करत तिचा छळ करण्यात येत असल्याची बाब समोर येत आहे. 

मुळच्या करुनागपल्ली येथील रहिवासी असणाऱ्या तुशारा यांची मोठ्या प्रमाणावर उपासमार करण्यात येत असल्याची माहिती  पोलीस अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना दिली. पती आणि सासूकडून तिचा मोठ्या प्रमाणावर छळ करण्यात आला असून, फक्त वाफवलेला भात साखरेच्या पाण्यावरच तिचा निर्वाह होत होता. पाच वर्षांपासून तिचा असाच छळ सुरु होता अखेर कोल्लम येथील सरकारी रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला.

शवविच्छेदन अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार त्या महिलेचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याची बाब उघड होत आहे. तुषाराच्या मृत्यूनंतर तिचा पती चंदूलाल आणि सासू गीता लाल यांना शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 'अखेरच्या क्षणी ती हाडांच्या सांगाड्याप्रमाणेच दिसत होती. तिच्या मृत्यूविषयीच्या तपासातून अतिशय क्रूर चित्र समोर येत आहे. तिच्या नातेवाईकांनीही केलेल्या आरोपांनुसार जास्तीत जास्त हुंड्याच्या मागणीसाठीच तिचा छळ केला जात होता, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांना 'पीटीआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. 

तुषाराच्या आईनेही जावई चंदूलाल आणि त्याची आई गीता लाल यांच्यावर आपल्या मुलीचा छळ करण्याचा आरोप केला आहे. इतकच नव्हे तर आपल्या मुलीशी बारा महिने म्हणजे जवळपास एक वर्षभर त्यांनी भेटून नाही दिल्याचीही बाब उघड केली. 'माझ्या मुलीने अत्यंत वाईट छळाचा सामना केला आहे. तिच्या जीवाला धोका असेल ही भीती बाळगून आम्ही पोलीसांत तक्रारही केली नाही', असं तुषाराची आई म्हणाली. तुषाराचा मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याची माहिती तिच्या शेजारच्यांनीही दिली. 

२०१३ मध्ये तुषारा आणि चंदूलाल यांचं लग्न झालं होतं. चंदूलाल हा एक वेल्डर असून, पैशांसाठी तो इतर कामंही करत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या लग्नाच्या वेळी तुषाराच्या आईने सोन्याचे दागिने आणि पैसे चंदुलालच्या कुटुंबाला दिले होते. शिवाय भविष्यात दोन लाख रुपये देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं होतं. पण, सासरच्यांनी तिचा छळ करणं सुरूच ठेवलं.