नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेनेने आपला आक्रमकपणा दाखवून दिला आहे. महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवर केंद्र सरकारला धारेवर धरले. यावेळी शिवसेनेचा लोकसभेत विरोधी आवाज दिसून आला. ओला दुष्काळप्रकरणी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गदारोळ आणि घोषणाबाजी दिसून आली. शिवसेना खासदारांनी लोकसभा कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.
दरम्यान, भाजप सरकारला जाब विचारण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला होता. तर शिवसेना खासदारांने संसदेच्या प्रांगणात आंदोलन केले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ घोषणाबाजी करत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही केली. संसदेच्या बाहेर आवाज उठवताना सभागृहातही शिवसेनेचे खासदार अधिक आक्रमक झाले होते. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकरी प्रश्नावर जोरदार गदारोळ करत संसद डोक्यावर घेतली. त्यानंतर आपला विरोध दर्शवत शिवसेना खासदारांनी कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.
संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना भाजपविरोधात आक्रमक झालेली पाहायला मिळाली. ओल्या दुष्काळासाठी केंद्रानं मदत न जाहीर केल्यामुळे शिवसेनेच्या खासदारांनी सभात्याग करत कामकाजावर बहिष्कार घातला. तर दुसरीकडे भाजपविरोधात आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या खासदारांनी संसद भवन प्रांगणातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जोरदार आंदोलन केले. ओल्या दुष्काळासंदर्भात करण्यात आलेली मदत तुटपुंजी असल्याचा आरोप करत शिवसेना खासदारांनी आंदोलन केले.
सोबतच खासदारांनी लोकसभेत देखील वेलमध्ये उतरून गोंधळ घालत घोषणाबाजी केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ओला दुष्काळासंदर्भात नंतर ऐकून घेणार अशी प्रतिक्रिया दिली मात्र तरी देखील शिवसेनेची घोषणाबाजी सुरूच होती.