उदयनराजेंसोबतच्या मनोमिलनाची शक्यता शिवेंद्रराजेंनी फेटाळली

 कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत त्यामुळे मला त्यांच्या पाठिशी रहावे लागेल असे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले.

Updated: Feb 18, 2019, 11:42 AM IST
उदयनराजेंसोबतच्या मनोमिलनाची शक्यता शिवेंद्रराजेंनी फेटाळली  title=

सातारा : सातारच्या दोन राजे म्हणजेच उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे मनोमिलन कधी होणार ? हा प्रश्न सातारकर जनतेला गेल्या अनेक वर्षांपासून पडला आहे. आगमी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी राष्ट्रवादीची मोट बांधायला सुरूवात केली. यावेळी या दोघांनाही डोकं शांत ठेवण्याचा सल्ला शरद पवारांनी दिला होता. पण आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत त्यामुळे मला त्यांच्या पाठिशी रहावे लागेल असे सांगत आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मनोमिलनाची शक्यता फेटाळून लावली आहे.

Image result for udayanraje and shivendra raje zee news

बदलापूरमधल्या सकल मराठा महोत्सवाच्या उदघाटनावेळी शिवेद्रसिंह राजे भोसले आले होते.  दोन्ही राजांचे मनोमिलन होईल का ? असा प्रश्न शिवेंद्रराजेंना यावेळी विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना दोन्ही गटांमध्ये कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन संघर्ष केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना महत्त्वाच्या आहेत. त्याचा आदर करता हे मनोमिलन अशक्य आहे असे ते म्हणाले. 

सातारच्या या दोन राजांनी एकत्र यावं यासाठी गेल्या अऩेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीसद्धा अलिकडेच डोकं शांत ठेवा असा सल्ला दिला होता. यातून मनोमिलन होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र काही शिवेंद्रराजे समर्थक शरद पवार यांच्या भेटीला गेले त्यांनी उदयनराजेंबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त समोर येत होते. त्यानंतर आता शिवेंद्रराजेंनीही आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असल्याचे सांगत मनोमिलनाची शक्यता फेटाळून लावली आहे. याचाच दुसरा अर्थ सातारच्या राजकारणात पुन्हा एकदा दोन राजांमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळू शकतो.