धक्कादायक! इंद्राणी म्हणते, शीना बोरा अजून जीवंत!

प्रसिद्ध शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने आता मोठा दावा केला आहे. 

Updated: Dec 16, 2021, 11:13 AM IST
धक्कादायक! इंद्राणी म्हणते, शीना बोरा अजून जीवंत! title=

मुंबई : प्रसिद्ध शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने आता मोठा दावा केला आहे. इंद्राणी मुखर्जीने दावा केला आहे की, तिची मुलगी शीना बोरा जिवंत असून ती काश्मीरमध्ये आहे. इंद्राणी मुखर्जीने सीबीआय संचालकांना लिहिलेल्या पत्रात हा दावा केला आहे.

सीबीआयला लिहिलेल्या पत्रात इंद्राणी मुखर्जीने दावा केला आहे की, ती नुकतीच तुरुंगात एका महिलेला भेटली. जिने तिला काश्मीरमध्ये शीना बोराला भेटल्याचं सांगितलं. इंद्राणी मुखर्जी म्हणाल्या की, सीबीआयने काश्मीरमध्ये शीना बोराचा शोध घ्यावा.

2012 मध्ये शीना बोराची हत्या झाली होती. या प्रकरणात इंद्राणी मुखर्जीला मुख्य आरोपी ठरवण्यात आलं. इंद्राणी 2015 पासून मुंबईतील भायखळा कारागृहात बंद आहे. गेल्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. इंद्राणी आता जामिनासाठी सुप्रीम कोर्टात जाऊ शकते असं सांगण्यात येतंय.

काय आहे शीना बोरा हत्याकांड

  • शीना बोरा हत्या प्रकरण उघडकीस आलं जेव्हा पोलिसांनी इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर श्यामवर राय याला बंदुकीसह अटक केली. चौकशीदरम्यान, त्याने सांगितले की, तो दुसर्‍या प्रकरणात सामील होता.
  • श्यामवारने मुंबई पोलिसांना सांगितलं होतं की, इंद्राणी मुखर्जीने 2012 मध्ये शीना बोराची गळा दाबून हत्या केली होती. इंद्राणी शीनाला तिची बहीण म्हणायची. पुढील तपासात समोर आले की, शीना बोरा ही इंद्राणीची पहिली मुलगी होती जी तिला मुंबईत घर मिळवून देण्यासाठी तिच्या आईला ब्लॅकमेल करत होती.
  • इंद्राणी मुखर्जीने मुलगी शीना आणि मुलगा मिखाईलला सोडून दिल्याचेही तपासात उघड झालं. शीनाला तिच्या आईबद्दल तेव्हा कळलं जेव्हा तिचे मीडिया एक्झिक्युटिव्ह पीटर मुखर्जीसोबतचा फोटो एका मासिकात आला होता.
  • त्यानंतर कथितरित्या शीना मुंबईत आली. त्याची आई इंद्राणी शीनाला बहीण म्हणायची. तिने पती पीटर मुखर्जी यांनाही हेच सांगितले. पण 2012 मध्ये शीना गायब झाली. नंतर राहुल मुखर्जी (पीटर मुखर्जी यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा) यांनी शीनाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. राहुल आणि शीनाचं प्रेम होतं. 
  • 2015 मध्ये जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा इंद्राणीने मुंबईतील वांद्रे येथे शीनाचा गळा दाबून खून केला आणि तिचा मृतदेह रायगड जिल्ह्यात पुरल्याचं तपासात उघड झालं. शीना बोराचे अवशेषही सापडल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. मात्र, इंद्राणीने ते फेटाळून लावले. 
  • इंद्राणीच्या अटकेनंतर तिचा पूर्वपती संजीव खन्ना यालाही मुलीच्या हत्येत मदत केल्याप्रकरणी आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. सीबीआयने तिचा पती पीटर मुखर्जी यांनाही अटक केली होती, ज्याला 2020 मध्ये जामीन मिळाला होता. खटल्यादरम्यान इंद्राणी आणि पीटरचा घटस्फोटही झाला.