Shraddha Murder Case : आफताबने श्रद्धाचं शीर तलावात फेकलं? पोलीस संपूर्ण तलाव रिकामा करणार

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात मोठी बातमी, Aaftab Poonawala ची नार्को टेस्ट आज होणार नाही, नार्को टेस्टआधी आफताबची मानसिक स्थिती तपासणार

Updated: Nov 21, 2022, 02:22 PM IST
Shraddha Murder Case : आफताबने श्रद्धाचं शीर तलावात फेकलं? पोलीस संपूर्ण तलाव रिकामा करणार title=

Shraddha Murder Case : श्रद्धा वालकरची निर्घुण हत्या करणाऱ्या आफताब पुनावालाची (Aaftab Poonawala) नार्को टेस्ट (Narco Test) आज होणार नाहीए. पण दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) त्यासाठी 40 प्रश्नांची यादीच तयार केलीय. आफताब चौकशीत आपली विधानं सारखी बदलतोय. तो दिशाभूल करत असल्याचा संशय पोलिसांना आहे, त्यामुळे पोलीस ही नार्को टेस्ट कऱणार आहेत. प्री नार्को टेस्टमध्ये आफताबसोबत संवाद साधून त्याची मानसिक स्थिती (Medical Checkup) तपासण्यात येईल. 

श्रद्धाचं शीर तलावात फेकलं
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आलीय. आफताबनं श्रद्धाची हत्या केल्यानंतर तीचं शीर धडावेगळं केलं आणि ते दिल्लीतल्या मैदान गढी तलावात (Delhi Maidan Garhi Lake) फेकल्याची माहिती समोर येतेय. त्यामुळे श्रद्धाचं शीर शोधण्यासाठी पोलीस हा संपूर्ण तलाव रिकामा करणार आहेत. त्यासाठी सर्व मशिनरी मागवण्यात आलीय. श्रद्धाची हत्या 6 महिन्यांआधी झाली होती. त्यामुळे तीचं शीर पूर्ण स्वरुपात मिळण्याची शक्यता कमीच आहे. पण छोटासा भाग जरी सापडला तरी त्याची डीएनए चाचणी (DNA Test) करता येईल असा दावा फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी केलाय. पण आफताब पोलिसांना खरंच सांगतोय की गुंगारा देतोय हे तलाव रिकामा केल्यानंतरच कळणार आहे.

आफताबला विचारण्यात येणारे काही महत्वाचे प्रश्न

- श्रद्धाची हत्या का आणि कशी केली?

-  हत्येआधी ड्रग्स घेतलेलं का, श्रद्धाला ड्रग्स दिलेलं का?

- श्रद्धाच्या अवयवांचे तुकडे केले का, ते कुठे फेकले?

-  हत्या केल्यानंतर फ्लॅट कसा साफ केला?

- श्रद्धाच्या हत्येनंतर किती मुलींसोबत संबंध होते?

-  श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावली ?

-  हत्येत वापरण्यात आलेले शस्त्र आणि पुरावे कुठे आहेत ?

-  श्रद्धाच्या हत्येत कोण कोण सहभागी आहे ?

तपास जंगलापासून तलावाकडे
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा तपास जंगलापासून आता तलावापर्यंत पोहोचला आहे. दिल्ली पोलीस आरोपी आफताबकडे गेल्या आठवड्यापासून चौकशी करत आहेत. आफताब सातत्याने आपले जबाब बदलत आहे. चौकशीत आफताबने श्रद्धाचं शीर तलावात फेकल्याचं सांगितलं. दुसरीकडे गेल्या आठवड्याभरापासून पोलीस मेहरौलीच्या जंगलात श्रद्धाच्या शरीराचे तुकडे शोधत आहे. आतापर्यंत 17 तुकडे पोलिासांनी जंगलातून हस्तगत केले आहेत. हे तुकडे हाडांच्या रुपात असून तपासासाठी फॉरेंसिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. 

पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज
दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) लागलं आहे. आफताबविरोधात हा एक मोठा पुरावा सिद्ध होऊ शकतो. 18 ऑक्टोबरच्या रात्री आफताब आपल्या पाठिवर एक बॅग घेऊन जाताना या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या बॅगेत श्रद्धाच्या शरीराचे तुकडे असण्याची शक्यता असून ते तुकडे फेकण्यासाठी मेहरौलची जंगलाच्या दिशेने जात असल्याचा पोलिसांचा दावा आहे.