Attack on Aftab Poonawalla: श्रद्धा हत्या प्रकरणाला (Shraddha Murder Case) आज अचानक वेगळं वळण लागलं. श्रद्धा वालकरची (Shraddha Walkar) हत्या करुन तिच्या शरीराचे 35 तुकडे करणाऱ्या आफताब पूनावालावर (Aaftab Poonawala) आज काही जणांना अचानक तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतलं आहे. सुरुवातीला हल्लेखोर हिंदू सेनेचे (Hindu Sena) कार्यकर्ते असल्याची माहिती मिळाली. पण हिंदू सेनेने निवेदन जारी करत हल्लेखोरांशी काही संबंध नाही, आमचा देशातील कायद्यावर विश्वास असल्याचं म्हटलं आहे.
आफताबवल हल्ल्याचा प्रयत्न
आरोपी आफताब पुनावाला याची आज पॉलीग्राफ टेस्ट (Polygraph Test) करण्यात आली. दिल्लीतल्या रोहिणी इथल्या फॉरेन्सिक लॅबमधून (forensic lab) दिल्ली पोलिस आफताबला व्हॅनने घेऊन जात होते, पण आधीपासूनच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी आपली कार पोलीस व्हॅनच्या समोर आडवी टाकली. त्यामुळे पोलीस व्हॅन थांबली. त्याचवेळी काही जणांनी तलवार हातात घेत व्हॅनच्या दिशेने धाव घेतली.
आफताबवर हल्ल्याचा थरार
पोलीस व्हॅनचा चालक गाडी पुढे घेणार तोच हल्लेखोरांनी व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला. व्हॅनमध्ये बसलेल्या आफताबला मारण्यासाठी हल्लेखोर पुढे सरसावले, हल्लेखोरांचा आक्रमक पवित्रा पाहता व्हॅनमधले पोलीसही सावध झाले. त्यांनी हल्लेखोरांवर बंदूक ताणली, त्यामुळे हल्लेखोर मागे सरकले. त्यानंतर पोलिसांनी व्हॅनचा दरवाजा बंद केला. पण हल्लेखोरांना व्हॅनवर बाहेरुन तलवारीने हल्ला केला.
आफताबचे 70 तुकडे करु
या गदारोळामुळे पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतलं. अटक होण्याची आम्हाला भिती नाही, आमच्या बहिणी-मुलींची आम्हाला सुरक्षा करायची आहे, यासाठी आम्हाला कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल अशी प्रतिक्रिया हल्लेखोरांनी दिली आहे. आम्ही सकाळपासून इथे बसून आफताब येण्याची वाट पहात होतो, काही दिवसांपूर्वी आम्ही रात्री 11 वाजताही आलो होतो, पण आफताब सापडला नाही. खूप दिवसांपासून आम्ही त्याची वाट पाहात असल्याचं हल्लेखोरांनी म्हटलंय. आमच्या बहिणीचे त्याने 35 तुकडे केले आम्ही त्याचे 70 तुकडे करु असा इशाराही त्यांनी दिला. हल्लेखोर एका कारमधून रोहिणी इथे आले होते, त्यांच्या कारमध्ये तब्बल 10 तलावरी आणि एक हाथोडा सापडला आहे.