ट्रान्सफिमेल मॉडेल जोया खानच्या रक्षाबंधनाची देशभर चर्चा

लिंग बदलून भावाला बांधली राखी; अनोखे रक्षाबंधन

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 7, 2017, 08:37 PM IST
ट्रान्सफिमेल मॉडेल जोया खानच्या रक्षाबंधनाची देशभर चर्चा title=
छायाचित्र सैजन्य: जोया खान फेसबुक

बडोदा : बडोद्याची पहिली ट्रान्सफिमेल मॉडेल जोया खान हिच्या रक्षाबंधनाची देशभर चर्चा होत आहे. वर्षभरापूर्वीच शस्त्रक्रियेद्वारे लिंगबदल करून घेतलेल्या जोयाने आपला भाऊ रियाज खान याला राखी बांधली. लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेनंतर जोया पुरूषापासून स्त्री बनली आहे. ट्रान्सफिमेल जोया ही एक यशस्वी ट्रान्सफिमेल मॉडेल म्हणून ओळखली जात असून, लिंगबदलानंतर तिचे हे पहिलेच रक्षाबंधन होते.

स्वत:बद्धल सांगताना जोया कोणताही आडपडदा न ठेवता बोलते. ती म्हणते ‘मी मुलगा होते. पण, लहानपणापासूनच मला मुलांची सोबत कधीच आवडली नाही. मुलांसोबत असताना मला नेहमीच अनकंफर्टेबल वाटायचे. मला एखाद्या मुलीसारखे जगायला आवडायचे. कधी कधी मी तसे वागायचेही किंवा तसा प्रयत्न करायचे. पण, आई-वडील मला नेहमीच टोकायचे. माझ्या अशा वागण्याला त्यांची परवाणगी नसे. तो काळ माझ्यासाठी अत्यंत कठीण होता. त्या कठीण काळात माझा भाऊ रियाजने मला मोठी साथ दिली’, असे जोया सांगते.

पूढे बोलताना जोया सांगते की, ‘माझ्या या वागण्यामुळे माझ्या आईवडीलांनी मला घारबाहेर काडले. तेव्हा माझ्यापूढे मोठे आव्हाण होते. पण, याही काळात रियाज माझ्या पाठिशी उभा राहिला. त्याने मला पाठींबा दिला. त्याने मला केवळ स्वत:च आर्थिक मदत दिली नाही तर, माझ्या सेक्स चेंजच्या शस्त्रक्रियेसाठी पैसैही उभा केले. आज मी जे काही आहे ते केवळ माझा भाऊ रियाजमुळेच’, असेही जोयाने म्हटले आहे. दै. भास्करशी बोलताना जोयाने ही प्रतिक्रीया दिली आहे.

पहिली राखी महादेवाला मग भाऊरायाला

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रक्षाबंधनाबद्धल बोलताना ती  म्हणते, ‘मी मुस्लिम असले तरी माझ्यासाठी सर्व धर्म सारखेच आहेत. इतर तरूणी ज्याप्रमाणे आपल्या भावाला राखी बांधतात त्याचप्रमाणे माझीही इच्छा होती की, आपणही आपल्या भावाला राखी बांधावी. रक्षाबंधन साजरे करण्यापूर्वी मी माहिती घेतली तर, यंदा मुहूर्त खूप कमी काळासाठी  होता. म्हणून मग मी सकाळीच भाऊ रियाजला फोन करून बोलावले आणि मुहूर्ताची वेळ पाळली. पण रियाजला राखी बांधण्याआधी मी महादेवाला राखी बांधली. ’ दरम्यान, ‘आता आपल्या आईवडीलांनी आपला स्विकार केला असून, रक्षाबंधनाचा सुंदर क्षण साजरा करण्यासाठी तेही माझ्या घरी आले होते’, असे जोयाने म्हटले आहे.

कोण आहे जोया खान?

जोया खान ही मुळची बडोद्याची असून, शहरातील पहिली ट्रान्सफिमेल आहे. तीची परमेश्वरावर नितांत श्रद्धा आहे. परमेश्वरावर श्रद्धा ठेऊनच तीने आपला लिंगबदलाचा लढा लढला. वर्ष-दीडवर्षापूर्वी तिने सेक्स चेंज केले. तिच्यावरील शस्त्रक्रीया यशस्वी झाली. तसेच, शस्त्रक्रियेनंतर आपण सामान्य जीवन जगत असल्याचेही जोया सांगते. जोयाने टॉलीवूडमध्ये एंट्री करण्यासाठी आपला व्हिडिओ बनवला आहे. सध्या ती फीमेल मॉडेलच्या रूपात काम करते. एक यशस्वी ट्रान्सफिमेल मॉडेल अशी तिची ओळख बनली आहे.