भारतीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर नेपाळमध्ये सामूहिक बलात्कार, हॉटेलमध्ये 6 जणांनी आधी मारहाण केली अन् नंतर...

उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यात राहणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर नेपाळच्या एका हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. तरुणीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 22, 2024, 06:02 PM IST
भारतीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर नेपाळमध्ये सामूहिक बलात्कार, हॉटेलमध्ये 6 जणांनी आधी मारहाण केली अन् नंतर... title=

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) महाराजगंज जिल्ह्यात राहणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर नेपाळच्या (Nepal) एका हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार (Gangrape) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तरुणीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत तिने आरोप केला आहे की, महाराजगंज जिल्ह्यातील तीन, गोरखपूर जिल्ह्यातील एक आणि नेपाळच्या दोन तरुणांनी हॉटेलमध्ये तिला मारहाण तसंच सामूहिक बलात्कार केला. 

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असणारी ही तरुणी नेपाळमध्ये फिरण्यासाठी गेली होती. यादरम्यान ती भैरहवामधील क्लब आणि कसिनोंमध्ये फिरत होती. यानंतर ती हॉटेलात गेली असता तिथे त्याच्यासह 4 भारतीय होते. आरोपांनुसार, 4 भारतीय आणि हॉटेलात उपस्थित 2 नेपाळी तरुणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. विरोध केला असता मारहाण करण्यात आली असाही तरुणीचा आरोप आहे. 

विरोध केला असता आरोपींनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी तरुणीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यानंतर हॉटेल मालकाने नेपाळ पोलिसांना बोलावलं. तपासानंतर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे 4 भारतीय आणि 2 नेपाळी तरुणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली. 

आरोपींना 7 दिवसांची रिमांड

डीएसपी भैरहवा मनोहर श्रेष्ठ यांनी सांगितलं की, भारतीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी 6 तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. यातील तीन तरुण अफरोज (36), सालू खान (27), अतर रझा (31) हे महाराजगंज जिल्ह्यातील रहिवासी आहेत, चौथा तरुण बदलू खान (27) हा गोरखपूरचा रहिवासी आहे. याशिवाय शाहरुख तेली (32) आणि अकबर खान (25, रा. पालिका चार, नेपाळमधील ओम सतीया गाव) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.