रजनीकांत यांच्या डाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला लावली शाई

निवडणूक अधिकारी म्हणतात, चूक झाली...

Updated: Apr 21, 2019, 11:09 AM IST
रजनीकांत यांच्या डाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला लावली शाई title=
रजनीकांत

चेन्नई : लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भारतात सध्या सर्वत्र लोकशाहीचा जागर पाहायला मिळत आहे. विविध टप्प्यांमध्ये भारतात सध्या मतदानाला सुरुवात झाली आहे. पण, या साऱ्या धामधुमीत काही चुकाही होत आहेत. अशीच एक चूक तमिळनाडूमध्ये झाल्याची माहिती आता समोर येत आहे. ज्यामध्ये सुपरस्टार रजनीकांत यांचं नाव समोर येत आहे. 

लोकसभा निवडणूकांच्या दुसऱ्या टप्प्यात १९ एप्रिलला अभिनेते रजनीकांत यांनीही मतदान केलं. त्यावेळी त्यांच्या डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात आली. मुख्य म्हणजे ही चूक आता संबंधित निवडणूक केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्यांना महागात पडू शकते. मतदानानंतर समोर आलेली ही बाब आता आनेकांचं लक्ष वेधत आहे. 

लोकसभा निवडणूक प्रक्रियेत झालेल्या या चुकीविषयी निवडणूक अधिकारी सत्यव्रत साहू यांनी ही चूक झाल्याचं म्हटलं. आयोगाकडून देण्यात आलेल्या निर्देशांनुसार हे स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की मतदानानंतर शाई लावण्यासाठी डाव्या हाताच्या तर्जनीलाच प्राधान्य देण्यात यावं. असं शक्य नसल्यासच उजव्या हाताच्या तर्जनीला प्राधान्य द्यावं. पण, या बाबतीत मात्र चूक झाल्याचं ते म्हणाले. तेव्हा आता निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. 

दरम्यान, अभिनय क्षेत्राकडून राजकारणाकडे वळलेल्या रजनीकांत यांनी यंदाची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. आपला पक्ष हा आगामी विधानसभा निवडणूकीवर लक्ष केंद्रीत करत असून, त्या निवडणुकांमध्ये चांगलं प्रदर्शन करण्याचा मानस असल्याचं खुद्द रजनीकांत यांनी स्पष्ट केलं होतं.