गुजरातमध्ये समाजवादी पक्ष लढणार केवळ पाच जागा

समाजवादी पक्षाने गुजरात विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निवडणुकीत समाजवादी पक्ष केवळ पाचच जागा लढवणार आहे. उर्वरीत जागांवर कॉंग्रेसला पाठिंबा देणार आहे.

Updated: Oct 23, 2017, 03:37 PM IST
गुजरातमध्ये समाजवादी पक्ष लढणार केवळ पाच जागा title=

लखनऊ : समाजवादी पक्षाने गुजरात विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निवडणुकीत समाजवादी पक्ष केवळ पाचच जागा लढवणार आहे. उर्वरीत जागांवर कॉंग्रेसला पाठिंबा देणार आहे.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीच हा निर्णय जाहीर केला आहे. अखिलेश यादव यांनी म्हटले आहे, गुजरातमध्ये पक्ष मजबूत असलेल्या ५ ठिकाणी समाजवादी पक्ष निवडणूक लढवेन. तर उर्वरीत ठिकाणी कॉंग्रेसला पाठिंबा देईन. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपासून समाजवादी पक्षाने कॉंग्रेससोबत आघाडी केली होती. उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेस-समाजवादी आघाडीस सत्ता मिळाली नाही. मात्र, या दोन्ही पक्षांची आघाडी कायम राहिली. गुजरातमध्ये विधानसभेच्या १८२ जागांसाठी निवडणुक होणार आहे.अखिलेश यादव यांनी म्हटले आहे की, गुजरातमध्ये समाजवादी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास आपण स्वत: जाणार आहोत.

दरम्यान, पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या कॉंग्रेससाठी गुजरात निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. तर, असलेली सत्ता टिकवून ठेवण्याचे आव्हान भाजपसमोर असणार आहे. गेली अनेक वर्षे गुजरात हे भाजपसाठी होम पिच ठरले आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे गुजरातमधूनच येतात. त्यामुळे होम पिचवरच विजयरथ रोखून भाजपला गारद करायचे कॉंग्रेसच स्वप्न आहे. त्यातूनच कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये जोर लावला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राहूल गांधी यांनी केलेले दौरे पाहता. त्याला लोकांमधून उत्फूर्त पाठिंबा मिळताना दिसत आहे. राहूल गांधी यांना हलवलेला सूर सापडल्यामुळे भाजपच्या गोटातही सतर्कता निर्माण झाली आहे. आपल्याला अॅण्टीइन्कंबन्सीचा फटका बसू नये यासाठी भाजपनेही गुजरातमध्ये मोर्चेबांधणी सुरू केली आहे.