स्टेच्यु ऑफ यूनिटीपर्यंत पोहचण्यासाठी Sea Planeची सुविधा; इतकं असेल तिकीट

पर्यटनाला चालना देण्यासाठी साबरमती रिव्हरफ्रंट आणि केवडिया कॉलनीदरम्यान सी प्लेनची सेवा सुरु होणार आहे.

Updated: Aug 30, 2020, 04:57 PM IST
स्टेच्यु ऑफ यूनिटीपर्यंत पोहचण्यासाठी Sea Planeची सुविधा; इतकं असेल तिकीट
संग्रहित फोटो

अहमदाबाद : कोरोनाची स्थिती पाहता सर्व काही सुरळित असल्यास, 31 ऑक्टोबर रोजी लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त, स्टेच्यु ऑफ यूनिटीपर्यंत (Statue of Unity)  जाण्यासाठी सी प्लेनची (Sea Plane) सुविधा उपलब्ध होणार आहे. गुजरातमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी साबरमती रिव्हरफ्रंट आणि केवडिया कॉलनीदरम्यान सी प्लेनची सेवा सुरु होणार आहे. याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्याची तयारी करण्यात येत आहे.

रिव्हरफ्रंट ते केवडिया कॉलनीपर्यंत सी प्लेनचं तिकीट 4800 रुपये ठरवण्यात आलं आहे. रिव्हरफ्रंट ते केवडिया कॉलनीपर्यंत 200 किलोमीटरच्या मार्गावर सी प्लेनची सुविधा सुरु केली जाईल. हे सी प्लेन स्पाइसजेट (SpiceJet) या खासगी विमान कंपनीमार्फत चालविले जाईल. गुजरात सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 22 जुलै 2020 रोजी राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, नागरी उड्डाण मंत्रालय (MoCA)आणि एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

सुरुवातीच्या काळात साबरमती रिव्हरफ्रंट ते केवडिया कॉलनीपर्यंत सी प्लेनची दररोज चार उड्डाणं सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पाईसजेट, या सुविधेसाठी 19 आसनव्यवस्था असलेलं सी प्लेन चालवणार आहे. ज्यात एकावेळी 14 प्रवाशांना बसण्याची सुविधा असून दोन पायलट आणि दोन क्रू मेंबर्स असणार आहेत. 

अहमदाबादमधील रिव्हरफ्रंट आणि स्टेच्यु ऑफ यूनिटीदरम्यान सी प्लेनची गती ताशी 170 किलोमीटर असू शकते. अहमदाबादपासून 198 किलोमीटरवर असलेल्या स्टेच्यु ऑफ यूनिटीपर्यंत पोहचण्यासाठी रस्ते मार्गाने जवळपास 3 तास 40 मिनिटं लागतात. सी प्लेन हे पाण्यात उतरु शकतं. याला समुद्री विमान बोललं जातं. सामन्य विमानांच्या तुलनेत समुद्री विमानांचे पंख स्थिर राहतात. पहिलं समुद्री विमान 1898 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विल्हेम क्रेसद्वारा बनवण्यात आलं होतं.