बैलाने गिळले 4 तोळ्याचे सोन्याचे दागिने

कुठे घडला हा अजब प्रकार 

Updated: Oct 23, 2019, 01:35 PM IST
बैलाने गिळले 4 तोळ्याचे सोन्याचे दागिने

मुंबई: हरियाणा येथे कालांवली परिसरात एक विचित्रच घटना घडली आहे. एका बैलाने तब्बल तीन तोळ्याचे दागिने गिळले आहेत. तर झालं असं, एका महिलेने गडबडीत भाज्यांसोबत घरातील सोनं घराबाहेरील कचऱ्यात फेकून दिलं. त्यानंतर बैलाने त्या कचऱ्यातील भाज्यांसोबत दागिने देखील गिळले. 

कुटुंबातील मंडळींना सोन्याचे दागिने हरवल्याचे कळलं. घरभर शोध घेतल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आलं. त्यामध्ये बैलाने ते सोन्याचे दागिने गिळल्याचं समोर आलं. कुटुंबाने तात्काळ बैलाचा शोध घेण्यास सुरूवात केली. अनेक तासानंतर बैलाचा शोध संपला. बैलाला पकडून आणून घरातच बांधून ठेवण्यात आलं. शेजारच्यांकडून बैलाकरता चारा आणला. तो भरपूर चारा आणि पाणी त्याला देऊन शेणाच्या माध्यमातून सोन्याचे दागिने मिळतील का? असा प्रयत्न देखील सुरू केला. 

शुक्रवारी हे कुटुंब एका कार्यक्रमातून परतले. कुटुंबातील सासू-सूनेने घरी आल्यावर दागिने स्वयंपाकघरात एका भांड्यात काढून ठेवले. यानंतर भाजी कापून टरफलं देखील त्याच भांड्यात ठेवण्यात आले आणि त्यामध्ये दागिने लपले गेले. काही वेळाने कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीने हा सगळा भाज्यांचा कचरा डब्यात टाकून दिला. त्यानंतर त्या आजी तेथेच घुमटळत राहिल्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की, कचऱ्याच्या डब्यात काही तरी सोन्यासारखं चमकत आहे. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, भाज्यांच्या कचऱ्यात सोन्याचे दागिने फेकले गेले. त्यानंतर दागिन्यांचा शोध सुरू झाला.