लैंगिक शोषण प्रकरणात सूरज रेवण्णाला अटक! कार्यकर्ता म्हणाला, 'त्याने माझे कपडे काढून..'

Suraj Revanna Arrested: पोलिसांनी शनिवारी वेगवेगळ्या गुन्ह्याअंतर्गत तक्रारी दाखल करुन घेत सूरज रेवण्णाला ताब्यात घेतल्यानंतर रविवारी या प्रकरणामध्ये मोठा खुलासा समोर आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 24, 2024, 10:07 AM IST
लैंगिक शोषण प्रकरणात सूरज रेवण्णाला अटक! कार्यकर्ता म्हणाला, 'त्याने माझे कपडे काढून..' title=
सूरज रेवण्णाला शनिवारी अटक करण्यात आली (सूरचा फोटो एनएनआयवरुन, फार्म हाऊसचा फोटो सोशल मीडियावर तर उजवीकडील फोटो प्रातिनिधिक)

Suraj Revanna Arrested: कर्नाटकमधील जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे आमदार असलेल्या सूरज रेवण्णाला (37) रविवारी गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आलं आहे. सूरजने एका पुरुष कार्यकर्त्याचं कथित लैंगिक शोषण केल्या प्रकरणी त्याला सीआयडीच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शनिवारी रात्री वेगवेगळ्या कलमांअंतर्गत सूरजविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता हा मोठा गौप्यस्फोट झाल्याने सूरजची चौकशी सीआयडीकडून केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे काही आठवड्यांपूर्वीच सूरजचा भाऊ तसेच माजी खासदार प्रज्वल रेवण्णालाही महिलांचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. 

या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल

सूरज रेवण्णा हा होलेनारसीपुरा मतदारसंघातील आमदार एच. डी. रेवण्णा यांचा थोरला पुत्र आहे. सूरजने 16 जून रोजी त्याच्या धानिकाडा येथील फार्महाऊसवर पक्षाच्या 27 वर्षीय कार्यकर्त्याचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कार्यकर्त्याबरोबर अनैसर्गिक संबंध ठेवल्याचा ठपका सूरज रेवण्णावर ठेवण्यात आला आहे. सदर प्रकरणामध्ये शनिवारी सायंकाळी होलेनारसीपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला. भारतीय दंड संहितेमधील कलम 377, 342, 506, 34 अंतर्गत सूरजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी त्याचा ताबा पोलिसांनी सीआयडीला दिला आहे.  

पीडित तरुणाने सांगितला धक्कादायक घटनाक्रम; 'त्याने माझे कपडे काढले अन्...'

आपण पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते आहोत असा दावा तक्रारदार व्यक्तीने केला आहे. आपण सूरजला कोल्लांगी गावात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भेटलो होतो, असंही पीडित तरुणाने सांगितलं आहे. "आम्ही एकमेकांचे फोन नंबर घेतले. त्याने नंतर मला 16 जून रोजी त्याच्या घानिकाडा येथील फार्महाऊसवर भेटण्यासाठी बोलवलं. मला तिथे प्रवेशद्वारावर पोलीस कर्मचारी भेटले. मी त्यांना सूरजचा मेसेज दाखवल्यानंतर त्यांनी मला आत प्रवेश दिला. मी आतमध्ये गेल्यानंतर सूरजच्या रुममध्ये प्रवेश केला असता सूरज जागेवरुन उठला आणि त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यास सुरुवात केली. त्याने माझ्या ओठांचं चुंबन घेतलं. तू माझ्याबरोबर राहिलास तर मी तुला राजकारणामध्ये फार मोठं करेन, असं सूरज मला म्हणाला. नंतर त्याने माझे कपडे काढले. त्याने माझ्याबरोबर अनैसर्गिक संबंध ठेवले. माझा विरोध असतानाही त्याने बळजबरी करत संबंध ठेवले. त्याने मला धमकीही दिली. मी शिवकुमार यांना हे सारं सांगितल्यानंतर त्यांनी मला सूरजकडून तुझ्या नोकरीची व्यवस्था करतो आणि तुला पैसे देतो असं आमिष दाखवलं," असं तक्रारदाराने म्हटलं आहे.

पीडित व्यक्तीविरुद्ध दाखल केली तक्रार

दरम्यान, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू असलेल्या सूरजने त्याच्यावरील हे सर्व आरोप फेटाळले आहेत. आपल्याकडून पैसे उकळण्याच्या उद्देशाने ही तक्रार करण्यात आल्याचा दावा सूरजने केला आहे. सूरजने त्याचा निकटवर्तीय असलेल्या शिवकुमारच्या माध्यमातून त्याच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या कार्यकर्त्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या कार्यकर्त्याने सूरजकडे आधी पाच कोटींची मागणी केली. मात्र ती नाकारल्यानंतर त्याने 2 कोटींची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास आपण लैंगिक छळाच्या आरोपात तुला आडकवू अशी धकमी दिल्याचं शिवकुमारने त्याच्या तक्रारीत म्हटलं आहे.