विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. महाराष्ट्रात प्रचारासाठी सर्व पक्षांच्या मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली आहे. दुसरीकडे सर्व उमेदवार दारोदारी जाऊन प्रचार करत आहेत. यादरम्यान कर्जत येथील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पहिल्या क्रमांकाचं बटण दाबा, कारण इतर बटणं खराब झाली आहेत अस ते मतदारांना सांहत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने याची दखल घेतली असून, निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
कर्जत येथे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या कार्यकर्त्यांकडून ईव्हीएमबाबत खोटा प्रचार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महेंद्र थोरवे यांच्या प्रचारात डमी ईव्हीएम घेवून लोकांची दिशाभूल केली जात आहे. ईव्हीएमचे केवळ 1 नंबरचे बटण सुरू असून बाकीची बटण बंद आहेत, त्यामुळे फक्त 1 नंबरचं बटण दाबण्यास सांगितलं जात आहे. खासकरून निरक्षर मतदार आणि आदिवासी पाड्यांमध्ये असा प्रचार केला जात आहे. यासंदर्भात ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.