मुसळधार पाऊस आणि बदलत्या हवामानाने आजाराचे थैमान; २० दिवसांत ११ जणांचा मृत्यू

साथीच्या रोगांचं थैमान

Updated: Aug 24, 2019, 07:30 PM IST
मुसळधार पाऊस आणि बदलत्या हवामानाने आजाराचे थैमान; २० दिवसांत ११ जणांचा मृत्यू title=

सूरत : बदलतं हवामान आणि मुसळधार पावसामुळे व्हायरल ताप आणि न्यूमोनियाने सूरतमध्ये साथीच्या रोगांनी थैमान घातलं आहे. सूरतमध्ये गेल्या २० दिवसांत ११ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १२ हून अधिक रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्याचं समजतं आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी न्यूमोनिया आणि तापाने दोन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता आरोग्य विभागाकडून याबाबत गंभीरतेने दखल घेण्यात आली आहे.

सूरतमध्ये एक महिला आणि एका ६ महिन्याच्या चिमुरड्याचा न्यूमोनिया आणि व्हायरल तापाने मृत्यू झाला. त्यानंतर आरोग्य विभागाने सर्व भागात वैद्यकीय तपासणी सुरू केली आहे. रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य विभागाकडून सर्व रुग्णालयांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गुजरातव्यतिरिक्त उत्तर प्रदेशातही न्यूमोनियाने थैमान घातलं आहे. उत्तर प्रदेशात न्यूमोनियाने २ मुलांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या अनेक प्रयत्नांनंतरही ताप, न्यूमोनियाच्या रुग्णांची संख्या वाढतच असल्याचं समोर आलं आहे.