सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, वडिलांनी दिली या व्यक्तीविरोधात तक्रार

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. 

Updated: Jul 28, 2020, 07:47 PM IST
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, वडिलांनी दिली या व्यक्तीविरोधात तक्रार title=

मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला नवीन वऴण लागलं आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांनी रिया चक्रवर्तीविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. त्यांनी हा एफआयआर पाटणा येथील राजीव नगर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. रियाने सुशांतकडून पैसे घेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केके सिंह यांनी केला आहे. आयपीसीच्या कलम 341, 342, 380, 406, 420, 306 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात सुशांतचे वडील केके सिंह यांनी आपल्या अर्जात लिहिले आहे की, मुंबई पोलिसांकडून केलेल्या तपासणीवर त्यांना विश्वास नाही. त्यामुळे पाटणा पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. केके सिंह यांनी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप केले आहेत. केके सिंग यांच्या तक्रारीनुसार, रियाने सुशांतची फसवणूक केली असून त्याच्याकडून पैसे हडपले. तसंच सुशांतला कुटुंबातून पूर्णपणे वेगळं केलं होतं.

पाटण्याचे एसएसपी उपेंद्र शर्मा यांच्या आदेशानुसार राजीव नगरचे पोलीस स्टेशन प्रभारी या प्रकरणाचे आयओ बनविण्यात आले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यांची टीम मुंबईला पाठविली आहे. ही टीम मुंबई पोलिसांना भेटून केस डायरीशिवाय आवश्यक कागदपत्रे मिळवण्याचा प्रयत्न करेल. या टीममध्ये दोन निरीक्षक आणि दोन उपनिरीक्षक आहेत.

यापूर्वी रिया चक्रवर्ती हिने मुंबई पोलिसांना दिलेल्या जवाबात सांगितले होते की, ती आणि सुशांत एकमेकांना डेट करत होते आणि लग्न करणार होते. मात्र, सुशांतच्या निधनानंतर चाहते सतत रियाला ट्रोल करत होते. सुशांतच्या आत्महत्येच्या एक महिन्यानंतर रियाने एक भावनिक पोस्ट शेअर केली, पण तिला तिच्या पोस्टवर जबरदस्त ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणीही रियाने ट्विटरवर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. सुशांतने 14 जून रोजी मुंबईतील त्यांच्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली आणि त्याच्या निधनानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे.