नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध बिघडले असताना, रोहान सिद्दीकीमुळं दोन्ही देशांमध्ये प्रेमाचं नवं नातं पाहायला मिळालं. चार महिन्याच्या रोहानच्या हृदयामध्ये छिद्र असल्यानं त्याला उपचारासाठी भारतात आणावं लागणार होतं.
पण भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव, पाकिस्तानकडून भारतीय सैन्यावर होणारे हल्ले, कुलभूषण जाधवला झालेली अटक अशा बिघडलेल्या संबंधांमुळं त्याला विसा मिळत नव्हता. त्यामुळं रोहानची तब्येत खालावत चालली होती. अशावेळी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पाकिस्तानी रोहानच्या मदतीला धावून आल्या.
सुषमा स्वराज यांनी रोहानला तातडीनं मेडिकल विसा उपलब्ध करून दिला. एवढंच नव्हे तर त्याच्या वैद्यकीय उपचारांचा सर्व खर्चही त्यांनीच केला. जूनमध्ये भारतात आलेला रोहान सिद्दीकी आता बरा होऊन पाकिस्तानला परततोय. रोहानला नवं जीवनदान मिळाल्यानं त्याच्या वडिलांनी भारताचे विशेषतः रोहानसाठी देवदूत ठरलेल्या सुषमा स्वराज यांचे खास आभार मानलेत.