काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी 'या' नेत्याला मिळायचे लाखो रुपये

रमजानच्या महिन्यात तहरिक-ए-हुर्रियत आपल्या वृत्तपत्रात देणगीसाठी जाहिराती देत असे.

Updated: Aug 8, 2019, 10:01 AM IST
काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी 'या' नेत्याला मिळायचे लाखो रुपये title=

नवी दिल्ली: अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यामुळे सध्या जम्मू-काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आता स्थानिक पक्ष असणाऱ्या 'हुर्रियत'चे प्रमुख नेते सय्यद अली गिलानी यांना लाखो रुपये मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काश्मीरमधीलच एका फुटीरतावादी नेत्याने चौकशीदरम्यान हा गौप्यस्फोट केला. 

'इकॉनॉमिक टाईम्स'च्या माहितीनुसार, सय्यद अली गिलानी यांना गुप्तपणे निधी पुरवला जात असे. दर महिन्याला त्यांना सहा ते आठ लाख रुपये मिळायचे. गिलानी यांनी या निधीचे सर्व पुरावे नष्ट केल्याचेही या फुटीरतावादी नेत्याने सांगितले. 

दहशतवादी कारवायांना पैसा पुरवल्यासंबंधी सध्या या नेत्याची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी सुरु आहे. यावेळी त्याने एनआयएच्या अधिकाऱ्यांना गिलानी यांच्याविषयी माहिती दिली. गिलानी यांच्या तहरिक-ए-हुर्रियत पक्षाकडून निधी उभारला जातो. 

या निधीसाठी अनेक गुप्त व्यक्तींकडून सहा ते आठ लाखांच्या देणग्या येतात. बहुतांश लोकांना याबद्दल माहिती नाही. मात्र, यामध्ये काश्मीरमधील व्यापारी जहूर वटाली याचा मोठा वाटा असल्याचेही संबंधित फुटिरतावादी नेत्याने सांगितले. 

रमजानच्या महिन्यात तहरिक-ए-हुर्रियत आपल्या वृत्तपत्रात देणगीसाठी जाहिराती देत असे. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक व्यापारी आणि पदाधिकारी पक्षाला देणगी देत असत. यापैकी ६० टक्के निधी जिल्हाध्यक्षांकडे जात असे तर ४० टक्के निधी गिलानी यांना मिळायचा, असेही या नेत्याने सांगितले. 

या माहितीच्याआधारेच लाचलुचपत प्रतिबंध विभागाने वटाली आणि जम्मू-काश्मीर बँकेविरोधात कारवाई केली होती. तसेच वटाली याच्यासह अनेक फुटीरतावादी नेत्यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र सादर करण्यात आले होते. मात्र, यानंतर सर्वोच्च न्यायालयाने वटालीला जामीन मंजूर केला होता.