Taj Mahal : ताजमहाल वादावरुन मेहबूबा मुफ्ती यांचं भाजपला थेट आव्हान

ताजमहालच्या 22 बंद खोल्यांमध्ये नेमकं आहे तरी काय?

Updated: May 10, 2022, 05:17 PM IST
Taj Mahal : ताजमहाल वादावरुन मेहबूबा मुफ्ती यांचं भाजपला थेट आव्हान title=

नवी दिल्ली : वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीनंतर आता ताजमहालचे ही सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. ताजमहालच्या 22 बंद खोल्या उघडण्याची मागणी जोर धरत आहे. या खोल्यांमध्ये हिंदू देवदेवतांच्या मूर्ती आहेत. असा दावा केला जात आहे. याबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. 

हा वाद सुरु असतानाच पीडीपी अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी ताजमहालबाबत भाजपला मोठे आव्हान दिले आहे.

तुमच्यात हिम्मत असेल तर ताजमहाल आणि लाल किल्ल्याचे मंदिर बनवा आणि मग बघूया भारतात किती लोक ते बघायला येतील, असे मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या. भाजप लोकांना रोजगार देऊ शकत नाही हे दुर्दैव आहे. महागाई नियंत्रणात आणता येत नाही. देशाची संपत्ती विकली जात आहे. आज आपला देश बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ यांच्याही मागे गेला आहे. पण या लोकांना याची पर्वा नाही.

लोकांना मुस्लिमांच्या मागे लावले जात असल्याचे मेहबुबा म्हणाल्या. त्यात मशिदीपासून ताजमहालपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. देशाचा पैसा लुटून पळून गेलेल्यांना परत आणण्याऐवजी या लोकांना मुघल काळात बांधलेल्या मालमत्ता नष्ट करायच्या आहेत.

ताजमहालच्या सर्वेक्षणाची मागणी

ताजमहालमध्ये हिंदूंच्या मूर्ती असल्याचा दावा करणारी याचिका लखनौ खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. यासोबतच ताजमहालचे सर्वेक्षण करण्याची मागणीही करण्यात आली आहे. ताजमहालवर शिवमंदिर असून इमारतीच्या २२ बंद खोल्यांमध्ये हिंदू देवदेवतांच्या मूर्ती असल्याचा दावा केला जात आहे, त्यामुळेच या खोल्या उघडण्याचा मुद्दा या याचिकेत मांडण्यात आला आहे.

ज्ञानपवी मशिदीच्या सर्वेक्षणावरून देशात यापूर्वीच वाद निर्माण झाला आहे. आता ताजमहालवरूनही राजकारण सुरू झाले आहे. ज्ञानवापीचे सर्वेक्षण योग्य असून मंदिर पाडून येथे मशीद कशी बांधली, हे सत्य लोकांसमोर यावे, अशी भाजपची मागणी आहे.