विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : कोरोनाचे दोन्ही डोस घेणाऱ्यांसाठी खुशखबर. तुमचं कोरोना लसीकरण पूर्ण झालं असेल तर लवकरच तुम्हाला देशभरात बिनधास्त फिरता येणार आहे. कोरोना लसीकरण तज्ज्ञ समितीनं तशी शिफारस केलीय.
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना, विमान प्रवास करताना कोरोना चाचणी करणं अनिवार्य आहे. अनेकदा परराज्यातून आलेल्यांना क्वारंटाईन देखील व्हावं लागतं. याबाबत प्रत्येक राज्यात, जिल्ह्याजिल्ह्यात वेगवेगळे नियम आहेत. पण या नियमातून लवकरच मुक्तता होणार आहे.
'दोन डोस घ्या, कुठेही फिरा'
ज्या नागरिकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि डोस घेऊन दोन आठवडे उलटले आहेत, त्यांना यापुढे देशांतर्गत प्रवास करताना आरटीपीसीआर कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. तसंच क्वारंटाईन होण्याचीही आवश्यकता नाही, अशा शिफारसी कोरोना लसीकरण राष्ट्रीय तज्ज्ञ समिती तसंच तांत्रिक सल्लागार समितीनं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला केल्या आहेत. अगदी परदेशात जाताना किंवा मायदेशी परतताना कोरोना चाचणी आणि क्वारंटाईन होण्याची गरज नाही, मात्र त्या देशातल्या सरकारच्या नियमांवर ते अवलंबून असणार आहे.
कोरोना लसीकरण तज्ज्ञ समितीच्या बैठकीत झालेल्या या निर्णयांची माहिती केंद्र सरकारकडून विविध राज्य सरकारांना पाठवण्यात आली आहे. पण लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोविड नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. मास्कचा वापर असो की सोशल डिस्टन्सिंगचे नियम हे पाळावेच लागणार आहेत.
दरम्यान, तज्ज्ञ समितीच्या या शिफारशींबाबत अनेकांनी सावधगिरीचा इशाराही दिलाय. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी पूर्णपणे संपलेलं नाही. काही राज्यात अजूनही कोरोनाचा धोका जास्त आहे. त्यामुळे लगेचच निर्बंध शिथिल करणं घाईचं ठरेल असं मत व्यक्त होत आहे.
केंद्रीय तज्ज्ञ समितीच्या या शिफारशींवर महाराष्ट्र सरकारनं अजून शिक्कामोर्तब केलेलं नाही. त्यामुळं राज्यात कोरोनाची लस घेतलेल्यांना त्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.