चेन्नई : कोरोनामुळे सगळ्यांचं आयुष्य बदलून गेलं आहे. याचा परिणाम सण-समारंभ आणि सोहळ्यांवर देखील झाला आहे. देशात अनेकांनी लग्न समारंभ पुढे ढकलले तर काहींनी लॉकडाऊनमध्ये घरच्यांच्या उपस्थितीत उरकून घेतले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आता नवविवाहित दाम्पत्यानं एक भन्नाट आयडिया निवडली आहे.
लग्न समारंभात अनेक जण आहेर आणतात. अशावेळी आहेर आणल्यानंतर त्यासोबत कोरोनाच्या संसर्गाचाही धोका तेवढाच येत असतो. अशावेळी नवं विवाहित दाम्पत्यानं या आहेर नको, कोड स्कॅन करा अशी एक मोहीम सुरू केली. नेमका काय आहे हा प्रकार आणि का होतेय या लग्नाच्या पत्रिकेची चर्चा जाणून घेऊया.
तमिळनाडूमधील मदुराई परिसरात एका जोडप्यानं आपल्या लग्नाच्या पत्रिकेवर थेट गुगल पे आणि फोन पेचा QR कोड देण्यात आला. त्यामुळे सर्वांच्या आश्चर्यानं भुवया उंचावल्या आहेत. आमच्यासाठी आपले आशीर्वाद मोलाचे आहेत. त्यामुळे कपडे अथवा भांड्याचे आहेर आणू नयेत. असा मजकूर देखील लग्नपत्रिकेवर छापण्यात आला होता.
कोरोनामुळे लग्नाला येऊ न शकलेल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना आहेर पाठवण्यासाठी दाम्पत्यानं एक आयडिया वापरली आहे. या दाम्पत्यानं QRकोड छापला आहे. या QR कोडच्या मदतीनं आहेर थेट बँक खात्यात आहेर पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
तमिळनाडूतील मदुराई इथे शिवशंकरी आणि सरवनन यांचा विवाहसोहळा 17 जानेवारीला पार पडला. त्यांनी सुरू केलेल्या या आगळ्या वेगळ्या मोहिमेचं सोशल मीडियावर तुफान कौतुक होत आहे. 30 हजारहून अधिक लोकांनी या कोडच्या मदतीनं आहेर पाठवल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
कोरोनामुळे अनेक बदल घडले. ऑनलाइन पेमेंट सुविधेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. लग्न सोहळे आटोपशीर होऊ लागले. कधीही विचार केला नसेल अशा युक्त्या आणि आयडिया देखील याच कालावधीत सर्वांसमोर आल्या. त्यापैकीच ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर नव्या वर्षात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांच्या या कल्पनेचं खूप कौतुक देखील केलं जात आहे.