नवी दिल्ली : भारतीय सेनेनं काही दिवसांपूर्वी मारुती जिप्सीच्या ऐवजी 'टाटा सफारी - स्टॉर्म'चा आपल्या ताफ्यात सामील करण्याचा निर्णय घेतला. यानंतर सेनेकडून टाटाला तब्बल 3000 गाड्यांचं कॉन्ट्रॅक्टही मिळालं... त्यानंतर टाटानं भारतीय सेनेसाठी सुरक्षित आणि योग्य गाड्या तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतलीय... अनेक टेस्टमध्ये या गाड्या पास झाल्यानंतर आता या गाड्यांची डिलिव्हरीही सुरू झालीय. त्यामुळे आता भारतीय सेनेच्या ताफ्यात मारुती जिप्सी, महिंद्रा MM550 DXB आणि हिंदुस्ताव अॅम्बेसेडरच्या ऐवजी टाटा स्टॉर्म दिसणार आहे.
या गाडीचा वापर भारतीय सेनेकडून स्टाफ कार, पेट्रोलिंग व्हेईकल तसंच युद्धभूमीतही करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने ही दमदार कार जवानांना योग्य ती सुरक्षा देऊ शकेल, याची काळजीही कंपनीनं घेतलीय. उल्लेखनीय म्हणजे, स्टॉर्मचं हे वर्जन सामान्य नागरिकांना मात्र उपलब्ध होणार नाही. ऑलिव्ह ग्रीन रंगाच्या या गाड्या सहज ओळखता येऊ शकतील.
- खास सेनेसाठी सफारीच्या बोनटवर अॅन्टीना लावण्यात आलाय. त्यामुळे प्रवासातही जवान आपल्या युनिटच्या संपर्कात राहू शकतील.
- सोबतचज गाडीच्या पाठीमागे एक पिंटल हूक देण्यात आलाय. याच्या मदतीनं इतर गाड्याही सहज खेचता येऊ शकतील.
- गाडीत अतिरिक्त हेडलॅम्प देण्यात आलेत त्यामुळे रात्री किंवा कठिण परिस्थितीतही भारतीय जवान गाडी चालवू शकतील.
- या गाड्यांमध्ये बाजुला जॅरीकॅनला लटकावण्यासाठी जागा बनवण्यात आलीय... त्यामुळे दूरच्या भागांमध्ये इंधन स्टोअर करून घेऊन जाता येईल.
- गाडीत पॉवर स्टिअरिंग, एसी, एअरबॅग स्टॅडर्ड देण्यात आलेत.
- खास सेनेसाठी या व्हर्जनच्या इंजिनमध्येही काही बदल करण्यात आलेत... त्यामुळे गाडीची ताकदही वाढलीय. परंतु, ते बदल काय असतील याचा मात्र खुलासा करण्यात आलेला नाही.