कर्मचार्‍यांच्या मृत्यूनंतरही ही कंपनी देणार 60 वर्षे पूर्ण वेतन; घर-वैद्यकीय आणि मुलांचे शिक्षण विनामूल्य

टाटा स्टील कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांसाठी मोठी घोषणा केली आहे. 

Updated: May 24, 2021, 07:15 PM IST
कर्मचार्‍यांच्या मृत्यूनंतरही ही कंपनी देणार 60 वर्षे पूर्ण वेतन; घर-वैद्यकीय आणि मुलांचे शिक्षण विनामूल्य title=

मुंबई : कोरोनाकाळात सरकारने शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊन लावला, परंतु त्यानंतर अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामध्ये नोकरदार वर्गाला आपल्या जिवनावशक वस्तुंचा खर्च कसा भागवाव? हाच प्रश्न पडला आहे. त्यात आपल्या मुलांचा आणि कुटुंबाच्या भविष्याचा विचार करणे ही तर लांबचीच गोष्ट राहिली. परंतु टाटा स्टील कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुखद बातमी दिली आहे. या बातमीमुळे टाटा कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याना आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता करण्याची गरज नाही.

सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला पेन्शन मिळतो, पण खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचार्‍यांचं काय? त्यांची काळजी कोण घेणार? साथीच्या काळात, अनेक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यां त्यांच्या कामगारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना काही मदत पुरवत आहेत, परंतु ती मदत दीर्घकाळापर्यंत पुरेशी नाही. परंतु टाटा स्टीलने त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेली मदत कर्मचाऱ्यांनी भविष्याची काळजी विसरायला लावणारी आहे.

टाटा स्टीलची सर्वात मोठी घोषणा

टाटा स्टील कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांसाठी मोठी घोषणा केली आहे. कोरोना संकटाच्या वेळीही कर्मचारी सातत्याने आपले कर्तव्य बजावत आहेत. या काळात काही कर्मचार्‍यांचा मृत्यूही झाला आहे.

अशा परिस्थितीत कंपनीने मोठी घोषणा करत म्हंटले आहे की, कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतरही 60 वर्षे त्याच्या कुटुंबास संपूर्ण वेतन दिले जाईल. याबरोबरच त्यांना घराची आणि वैद्यकीय सुविधादेखील देण्यात येणार आहे. इतकेच नाही तर मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही कंपनी उचलणार आहे.

टाटा स्टील व्यवस्थापनाने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना सामाजिक सुरक्षेच्या मदतीसाठी सर्वतोपरी पुढाकार घेत आहे, जेणेकरून कंपनीत कार्यरत प्रत्येक कर्मचार्‍यांचे भविष्य उत्तम होईल. टाटा व्यवस्थापनाने म्हंटले आहे की, कोरोनामुळे एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असेल तर टाटा स्टील 60 वर्षे त्याच्या अवलंबितांना संपूर्ण वेतन देईल.

पगाराशिवाय कर्मचार्‍यांच्या कुटूंबांनाही  वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातील. एवढेच नव्हे तर, टाटा स्टील व्यवस्थापनाने असेही जाहीर केले आहे की, जर कर्तव्य बजावताना कंपनी कामगार मरण पावला तर त्यांच्या मुलांच्या पदवीपर्यंतचा संपूर्ण खर्च कंपनी व्यवस्थापन करेल.

टाटा यांनी कर्मचार्‍यांच्या हितासाठी अनेक पावले उचलली

टाटा स्टील व्यवस्थापनचे म्हणणे आहे की, कंपनी नेहमीच आपल्या कर्मचार्‍यांच्या आणि भागधारकांच्या फायद्यासाठी विचार करत असते. कोविडच्या काळातही टाटा स्टील आपल्या सर्व कर्मचार्‍यांसाठी तसेच सामाजिक कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. यापूर्वीही टाटा यांनी कर्मचार्‍यांच्या हितासाठी अनेक पावले उचलली आहेत.

टाटा स्टील ही देशातील पहिली कंपनी आहे, जी आपल्या कर्मचार्‍यांसाठी 8 तास काम (शिफ्ट), कंपनीच्या नफ्यावर आधारित बोनस, सोशल सिक्योरिटी, प्रसूती रजा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी प्रभावीपणे अंमलात आणली आहे. टाटांच्या पुढाकारानंतरच देशातील इतर कंपन्यांनीही असे निकष अवलंबले आहे.