तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर यांनी घेतली मोदींची भेट

भाजपचे कडवे विरोधक आहेत के चंद्रशेखर राव

Updated: Dec 26, 2018, 07:17 PM IST
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर यांनी घेतली मोदींची भेट title=

नवी दिल्ली : तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेत आल्यानंतर राव यांची पीएम मोदींसोबत ही पहिली भेट आहे.

चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान मोदींसोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये दहा मागासलेल्या जिल्ह्यांसाठी फंड जारी करणे, तेलंगणासाठी फंड जारी करणे, तेलंगणासाठी वेगळ्या हायकोर्टाची मागणी आणि नव्या जिल्ह्यांमध्ये केंद्रीय विद्यालय आणि करीमनगर जिल्ह्यात नव्या आयआयटीची मागणी करण्यात आली.

के. चंद्रशेखर राव यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची देखील याआधी भेट घेतली. के चंद्रशेखर हे बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांची देखील भेट घेणार आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी देखील हैदराबादला जावून राव यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी सगळेच भाजप विरोधी पक्ष महाआघाडी करण्याचा विचार करत आहेत. के चंद्रशेखर राव यांना काँग्रेसला सोडून इतर पक्षांसोबत महाआघाडी करायची आहे. त्यामुळे ते इतर पक्षांच्या नेत्य़ांची भेट घेतांना दिसत आहेत.