गाजियाबाद : Attack on Asaduddin Owaisi: उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) खासदार आणि एआयएमआयएमचे प्रमुख (AIMIM) असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांनाही अटक केली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी आरोपी सचिनची चौकशी केली असता त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले.
आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी या गोळीबाराचा मास्टरमाईंड सचिनची चौकशी केली असता, त्याने सांगितले की, त्याला मोठा नेता बनायचे आहे आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या बोलण्याचा राग आला. त्यामुळे त्याने आपला मित्र शुभमसोबत हत्येचा कट रचला होता आणि मेरठ येथील मित्र अलीमला बोलावून शस्त्राची व्यवस्था केली होती.
मास्टरमाईंड सचिनने सांगितले की, जेव्हा त्याने अलीमकडून शस्त्र घेतले तेव्हा त्याने काय करायचे विचारले, तेव्हा त्याने अलीमला सांगितले की त्याला (ओवेसी) मारायचे आहे. त्यानंतर त्यांनी पूर्ण नियोजन केले पण जेव्हा त्यांनी ओवेसींवर गोळीबार सुरु केला तेव्हा ते खाली वाकले. त्यानंतर आरोपीने खालच्या दिशेने गोळीबार केला. ओवेसींना गोळ्या लागल्याचे त्यांना वाटले. त्यानंतर तो तेथून पळून गेला.
आरोपींनी सांगितले की, ओवेसी यांच्यावर हल्ल्याचा कट अनेक दिवसांपासून रचला जात होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सतत ओवेसींच्या लोकेशनवर लक्ष ठेवून होते. ओवेसी कोणत्या दिवशी कुठे सभा घेणार आहेत हे सोशल मीडियावरुन माहीत होते. ओवेसींच्या अनेक सभांना ते गेले होते, मात्र मोठ्या गर्दीमुळे त्यांना हल्ला करता आला नाही.
त्यानंतर ओवेसी मेरठमध्ये उमेदवार आरिफ यांच्या प्रचारासाठी जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मेरठला पोहोचल्यावर तिथल्या गर्दीमुळे प्लॅन बदलण्यात आला. मग कळलं की ते आता इथून दिल्लीच्या दिशेने जाणार आहे. त्यानंतर ओवेसी पोहोचण्याआधीच आरोपी पिलखुआ टोलवर पोहोचला आणि पोहोचताच त्यांच्या गाडीवर गोळीबार सुरु केला.