सिनेमा पाहण्यास नकार देणाऱ्या वडिलांना पेटवून दिले

त्यांची परिस्थिती गंभीर आहे.

Updated: Jan 11, 2019, 06:10 PM IST
सिनेमा पाहण्यास नकार देणाऱ्या वडिलांना पेटवून दिले

नवी दिल्ली : सिनेमा बघायला पैसे दिले नाही, म्हणून दक्षिणेतील अभिनेता अजितच्या चाहत्याने वडिलांनाच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना तामिळनाडू येथे घडली. पीडितेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर लगेच आरोपीला अटक करण्यात आली आहे. अजितचे वडील नोकरीला नसल्यामुळे घरात अत्यंत गरिबी आहे. बेरोजगार असल्यामुळे त्याचे वडील घरापासून काहीच अंतरावर असलेले एका बंद दुकानासमोर झोपले होते. आपल्या आवडत्या अभिनेत्याचा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. म्हणून तो त्याच्या वडिलांना सिनेमा पाहण्यासाठी पैसे मागायला गेला. वडिलांनी माझ्याजवळ पैसे नाहीत, असे सांगितल्यावर अजितला राग आला. त्यानंतर तो घरी परत गेला आणि रॉकेल घेवून आला. रागाच्याभरात त्याने वडिलांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले. त्या भागात असलेल्या लोकांनी धाव घेतली आणि अजितच्या वडिलांना जवळ असलेल्या मेडिकल रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांच्या अहवालानुसार, तरुणाचे नावदेखील अजित आहे. २० वर्षीय अजितने वडिलांकडे ‘विश्वासम’ हा सिनेमा पाहण्यासाठी पैसे मागितले होते. पण वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे अजितला राग आला आणि त्याने ४५ वर्षीय वडिलांना पेटवून दिलं. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या लोकांची पोलिस चौकशी करत आहे.  डॉक्टराच्या माहितीनुसार, पीडितेचे डोके, चेहरा, गळा आणि खांदे मोठ्या प्रमाणात भाजले आहे. त्यांची परिस्थिती गंभीर आहे. डॉक्टर त्यांना वाचवण्याचा पुरेपर प्रयत्न करत आहेत.