सरपंच अजय पंडित यांच्या हत्येचा बदला; शोपियाँमध्ये हिज्बुलच्या टॉप कमांडरचा खात्मा

सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे.

Updated: Jun 16, 2020, 04:58 PM IST
सरपंच अजय पंडित यांच्या हत्येचा बदला; शोपियाँमध्ये हिज्बुलच्या टॉप कमांडरचा खात्मा title=

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं. सुरक्षा दलाने शोपियाँमध्ये एका गावात लपलेल्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या एनकाऊंटरमध्ये हिज्बुलचा टॉप कमांडरही मारला गेला आहे. यासह सुरक्षा दलाने सरपंच अजय पंडित यांच्या हत्येचाही बदल घेतला आहे. सुरक्षा दलाने गेल्या एका महिन्यात 30 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शोपियाँमध्ये 10 दिवसांत 17 दहशतवाद्यांना मारण्यात आलं आहे.

जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी शोपियाँमध्ये तीन दहशतवादी मारण्यात आले. त्यापैकी एक हिज्बुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, हिज्बुलच्या ज्या दहशतवाद्यांनी सरपंच अजय पंडित यांची हत्या केली होती, त्या दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाने खात्मा केला आहे. 

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी, 'चकमकीत आतापर्यंत तीन दहशतवादी ठार झाले असून कारवाई सुरु आहे. घटना स्थळाहून शस्त्रास्त्र आणि दारुगोळादेखील जप्त करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

मध्यरात्री तुर्कवांगम येथे पोलिस, सेनेच्या 44RR आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त पथकाद्वारे शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. ज्या भागात दहशतवादी लपले होते, त्या भागात घेराव घालण्यात आला. दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठीही सांगण्यात आलं मात्र त्यांनी गोळीबार सुरु केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती, अधिकाऱ्यांनी दिली आहे.

शोपियाँ जिल्ह्यात आतापर्यंत चकमकीत या तीन दहशतवाद्यांसह इतर 30 दहशतवाद्यांना मारण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून आपल्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र भारतीय सैन्याकडून दहशतवाद्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले जात आहेत.

जून महिन्याच्या 8 तारखेला सायंकाळी लार्कीपोरातील लुकभावन गावाचे सरपंच अजय पंडित यांना त्यांच्या घरासमोरच गोळी मारुन त्यांनी हत्या करण्यात आली होती. त्यांची तब्येत अतिशय नाजूक असताना त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांना मृत्यू झाला.