नवी दिल्ली: लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री भारतीय आणि चिनी सैनिक एकमेकांना भिडले. यावेळी झालेल्या तुंबळ हाणामारीत भारतीय सैन्यदलातील एक कमांडिंग ऑफिसर आणि दोन सैनिक शहीद झाले. यानंतर भारत आणि चीनमधील तणाव प्रचंड वाढला आहे. दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजकीय पातळीवर वेगाने घडामोडी सुरु आहेत.
आतापर्यंत काय घडले?
* गलवान खोऱ्यातील १४ क्रमांकाच्या गस्तीच्या नाक्याजवळ भारतीय आण चिनी सैनिक एकमेकांना भिडले. यामध्ये चिनी लष्करातीलही काही जवान मृत्यूमुखी पडले आहेत.
* भारतीय आणि चिनी सैन्य भिडले तेव्हा दोन्ही बाजूच्या जवानांच्या हातात लोखंडी रॉड आणि दगड होते. यापूर्वी ५ आणि ६ मे रोजी पँगाँग लेकच्या पूर्वेकडील भागात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये अशीच तुंबळ हाणामारी झाली होती. यामध्येही दोन्ही बाजूचे अनेक सैनिक जखमी झाले होते.
* भारतीय सैन्याच्या माहितीनुसार, सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिक भिडले.
Sikkim Clash: भारतीय लेफ्टनंटने चीनच्या मेजरला एका बुक्कीत लोळवले
* या हाणामारीत तीन भारतीय जवान शहीद झाले. मात्र, यावेळी चिनी लष्करातील जवान मोठ्याप्रमाणावर जखमी झाले आहेत. यापैकी काहींचा मृत्यूही झाला आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
* या सगळ्या प्रकारानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्यदलप्रमुख बिपीन रावत आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांची तातडीची बैठक घेतली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हेदेखील बैठकीला उपस्थित होते. यावेळी पूर्व लडाखमधील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
* तर दुसरीकडे चीनने भारतीय सैन्याने १५ तारखेला रात्री दोनदा सीमारेषा ओलांडल्याचा आरोप केला. भारतीय सैनिकांनी आमच्या हद्दीत घुसखोरी करुन चिनी सैनिकांवर हल्ला चढवला. यानंतर दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.
* चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांना पत्रकारांनी भारतीय सैनिकांच्या मृत्यूविषयी विचारले. तेव्हा मला याविषयी काहीही माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले.
* झाओ लिजिआन यांनी पत्रकारांना सांगितले की, आमचे सैन्य सीमाप्रश्न सोडवण्यासाठी वरिष्ठ स्तरावरील बैठकांमध्ये सहभागी झाले होते. मात्र, १५ जूनला रात्री भारतीय सैन्याने आमच्या हद्दीत घुसखोरी करत चिनी सैन्यावर हल्ला चढवला. चीनने भारताकडे याविषयी तीव्र निषेध नोंदवला आहे.
हिंसक झडपमध्ये चीनच्या ५ सैनिकांचा मृत्यू तर ११ जखमी : ग्लोबल टाईम्स
* तब्बल ४५ वर्षानंतर प्रथमच भारत आणि चिनी सैन्यातील झटापटीत जवान शहीद झाल्याची घटना घडली आहे.
* यापूर्वी १९७५ मध्ये अरूणाचल प्रदेशच्या तुलूंग ला परिसरात चिनी सैनिकांनी भारतीय लष्करावर हल्ला केला होता. यामध्ये चार भारतीय जवान शहीद झाले होते.
* यानंतर प्रथमच भारत आणि चीनमधील तणाव इतक्या टोकाला पोहोचला आहेत. सध्या लडाखच्या पूर्व भागातील गलवान खोऱ्यासह अनेक ठिकाणी भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
* कालच लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी भारत आणि चीनने गलवान खोऱ्यातील सैन्य मागे घ्यायला सुरुवात केल्याचे सांगितले होते. यानंतर काही तासांतच हा प्रकार घडला.
* सध्या भारत आणि चीनचे सैनिक गलवान खोरे, पँगाँग लेक, डेमचोक आणि दौलत बेग ओल्डी या परिसरात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
* पँगाँग लेकसह अनेक भागात चीनच्या सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे निदर्शनास आले होते.
* भारतीय सैन्याने आक्रमकपणे या घुसखोरीला विरोध करत चीनला तात्काळ सैन्य मागे घेण्यास सांगितले होते. जेणेकरून या भागात पुन्हा शांतता प्रस्थापित होईल. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही बाजूच्या वरिष्ठ सैन्याधिकाऱ्यांमध्ये सातत्याने बैठकांचे सत्र सुरु आहे.