'धर्माच्या रक्षणासाठी' गौरी लंकेशची हत्या, वाघमारेनं दिली कबुली

अटक करण्यात आलेल्या परशुराम वाघमारे यानं आपला गुन्हा कबूल केलाय

Updated: Jun 16, 2018, 10:19 AM IST
'धर्माच्या रक्षणासाठी' गौरी लंकेशची हत्या, वाघमारेनं दिली कबुली  title=

बंगळुरू : पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीनं या भ्याड हल्ल्याची पोलखोल केल्याचा दावा केलाय. एसआयटीनं दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या परशुराम वाघमारे यानं आपला गुन्हा कबूल केलाय. आपल्या धर्माला वाचवण्यासाठी मी गौरी लंकेशची हत्या केली, असंही २६ वर्षीय वाघमारेनं म्हटलंय. वाघमारेला एसआयटीनं उत्तर कर्नाटकच्या विजयपुरा भागातून अटक केलीय. 

'मी चूक केली...'

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा गौरी लंकेश यांची हत्या केली तेव्हा परशुरामला याची कल्पनाही नव्हती की तो कुणाची हत्या करतोय, असंही चौकशीतून समोर आलंय. एसआयटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मे २०१७ मध्ये मला सांगण्यात आलं होतं की माझ्या धर्माला वाचवण्यासाठी मला एक हत्या करायचीय. मला तेव्हा माहीत नव्हतं की ती व्यक्ती कोण आहे... पण, मला आत्ता वाटतंय की मला एका महिलेला ठार करून मी चूक केलीय, असं परशुराम वाघमारेनं म्हटलंय.  

...असा रचला कट!

३ सप्टेंबर रोजी मला बंगळुरूला आणण्यात आलं. बेळगावात एअरगनची ट्रेनिंग दिली गेली, अशीही कबुली वाघमारेनं एसआयटीसमोर दिलीय. सर्वात अगोदर मला एका घरात नेलं गेलं. दोन तासांनंतर एका बाईकस्वारनं मला एका घराजवळ नेऊन ते घर दाखवलं... इथंच मला बंदुकीनं कुणाचा तरी जीव घ्यायचा होता. दुसऱ्या दिवशी एका बाईकस्वारानं मला बंगळुरच्या एका दुसऱ्या घरी नेलं. त्या घरात असलेल्या एका व्यक्तीनं मला आरआर नगरला नेलं. मी तिथं संध्याकाळपर्यंत होतो. मी त्याला सांगितलं की काम आजच संपवून टाकीन. परंतु, गौरी लंकेश त्यादिवशी उशिरा घरी आल्या. त्या घरातच होत्या. ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजल्याच्या सुमारास माझ्या हातात गन सोपवण्यात आली. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास आम्ही घराजवळ पोहोचलो... गौरी यांनी घराच्या बाहेर आपली कार थांबवली. जेव्हा मी त्यांच्याजवळ पोहचलो, तेव्हा त्या गेट उघडत होत्या... मी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. आम्ही परतलो आणि त्याच रात्री शहर सोडलं, असा घटनाक्रमही वाघमारेनं एसआयटीसमोर उघड केला. 

पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश

बंगळुरूच्या आरआर नगरमध्ये ५ सप्टेंबर २०१७ रोजी गौरी लंकेश यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पत्रकार आणि सामजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची हत्या या प्रकरणात अटक झालेल्या परशुराम वाघमारे यानेच केल्याचं विशेष तपास पथकाने म्हटलंय. गौरी लंकेश तसंच ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे आणि ज्येष्ठ लेखक एम. एम. कलबुर्गी यांची हत्या एकाच पिस्तुलानं झाल्याचं या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकानं म्हटलंय. मात्र हे पिस्तुल अजून पथकाच्या हाती लागलेलं नाही. 

वाघमारे श्रीराम सेनेचा कार्यकर्ता

ज्या टोळीसाठी ही हत्या करण्यात आली त्या टोळीची पाळमुळं जवळपास पाच राज्यात पसरल्याचं या पथकातल्या अधिकाऱ्याने म्हटलंय. या टोळीला कोणतंही नाव देण्यात आलेलं नाही. उजव्या विचारधारेसाठी ही संघटना काम करते. मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या पाच राज्यात या टोळीची पाळमूळं आहेत. या टोळीत महाराष्ट्रातल्या हिंदू जागृती समिती आणि सनातन संस्थेची माणसं भरती होत असली तरी या दोन संस्थांचा हत्याप्रकरणात थेट सहभाग असल्याचं प्रथमदर्शनी दिसत नसल्याचं एसआयटीने म्हटलंय. ज्या दिवशी गौरी लंकेश यांची हत्या झाली त्याच दिवशी परशुराम वाघमारे याला शस्त्र देण्यात आलं होतं. हत्या झाल्यानंतर परशुरामकडून शस्त्र तात्काळ काढून घेण्यात आलं. परशुराम हा श्रीराम सेनेचाच कार्यकर्ता असल्याची माहिती एसआयटीनं दिलीय. दरम्यान, विजापूरच्या श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष राकेश मठ याला एसआयटीने चौकशीसाठी बंगळुरला बोलावलं आहे.