९३ व्या वर्षी जन्मठेपेची सजा; कैद्याची सुप्रीम कोर्टात धाव

...

Updated: Jun 16, 2018, 10:15 AM IST
९३ व्या वर्षी जन्मठेपेची सजा; कैद्याची सुप्रीम कोर्टात धाव title=

नवी दिल्ली: न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची सजा पाहून कैद्याने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कौद्याचे वय ९३ वर्षे असून, त्याने आपणास मिळालेल्या शिक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ४० वर्षापूर्वी घडलेल्या एका प्रकरणात कैदी सजा भोगत होता. न्यायमूर्ती यू यू ललित आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या संयुक्त पीठाने या प्रकरणाची सुनावनी तातडीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या याचिकेवर येत्या १८ जूनला सुनावनी होऊ शकते.

उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

अलाहबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात रोहदास नावाच्या एका याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. रोहदासच्या वकिलाने न्यायालयात याचिका दाखल करताना म्हटले आहे की, आपल्या अशिलाची प्रकृती ठिक नसते. तो सतत आजारी असतो. तसेच, त्याच्या शरीराची डावी बाजू काम करत नाही. वैद्यकीय अहवालानुसार त्याच्या मेंदूत ब्लॉकेज आहेत. तो केव्हाही कोमात जाऊ शकतो. ज्यामुळे त्याच्या संपूर्ण शरीराला अर्धांगवायू होऊ शकतो. दरम्यान, उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याची याचिका १२ फेब्रुवारीला फेटाळली होती.

प्रकरण ४० वर्षे जुने

दरम्यान, कनिष्ठ न्यायालयाने १९८३ मध्ये आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पण, आरोपीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयानेही ही याचिका फेटाळली. त्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर आले आहे. हे प्रकरण बागपथ येथील असून ते २९ सप्टेबर १९७८मध्ये झालेल्या जमीनीच्या वादाशी आहे. पोलिस दप्तरी नोंद असलेल्या माहितीनुसार, रोहदास आणि अन्य एका व्यक्तीने मिळून प्रतिपक्षातील व्यक्तिस जीवे मारले होते.