वडिलांनी ज्याच्या भरवशावर सोडलं त्याच मामाने केला विश्वासघात; भाचीला गळा दाबून केलं ठार, नंतर शेणात टाकून...

Crime News: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांनी तरुणाला फार समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने ऐकलं नाही. यानंतर अखेर मामाने गळा दाबून तिची हत्या केली.   

शिवराज यादव | Updated: Feb 6, 2024, 03:47 PM IST
वडिलांनी ज्याच्या भरवशावर सोडलं त्याच मामाने केला विश्वासघात; भाचीला गळा दाबून केलं ठार, नंतर शेणात टाकून... title=

उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका मामानेच आपल्या भाचीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी मामाला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांनी तरुणाला फार समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने ऐकलं नाही. यानंतर अखेर मामाने गळा दाबून तिची हत्या केली. 

मेरठच्या भावनपूर येथील छिलौरा गावात हा प्रकार घडला आहे. गावकऱ्यांना शेणाच्या गोवऱ्यात एका तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. मृतदेह आढळल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांना मृतदेह सापडल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं होतं. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. तर दुसरीकडे मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु झाला होता. 

तपास केल्यानंतर पोलिसांनी हा मृतदेह 21 वर्षीय तृषा नावाच्या मुलीचा असल्याची माहिती मिळाली. तरुणीच्या वडिलांनीच मृतदेहाची ओळख पटवली. तपासादरम्यान, पोलिसांना तृषा आपल्याला मामाच्या घरी गेली होती अशी माहिती मिळाली. वडीलच तिला मामाच्या घरी सोडून आला होता. यानंतर पोलिसांनी तृषाचा मामा सोनूला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता धक्कादायक खुलासा झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मामाने चौकशीत सांगितलं की, तृषाचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. ज्यामुळे नातेवाईक फार नाराज होते. तृषाची यावरुन आपल्या आईशी एक-दोन दिवसांपूर्वी भांडणं झाली होती. या स्थितीत तिचे वडील तिला मामाच्या घरी सोडून आले होते. तिथे मामानेही तृषाला आपलं नातं तोडण्यासाठी समजावलं. पण तृषा काहीही ऐकण्यास तयार नव्हती. यानंतर अखेर  मामाने तृषाची गळा दाबून हत्या केली. यानंतर शेणाच्या गोवऱ्यात तिचा मृतदेह टाकला आणि प्रेट्रोलच्या सहाय्याने पेटवून दिलं. 

मेरठचे एसएसपी रोहित सिंह यांनी सांगितलं की, भावनपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. मृतदेहाची ओळख पटवण्यात आली असता तरुणी मुंडाली ठाणे क्षेत्रातील असून, तिच्या वडिलांनी तिला मामाच्या घऱी सोडलं होतं अशी माहिती मिळाली. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी मामाला अटक केली आणि घटनेचा खुलासा केला आहे. 

मामाने भाचीची हत्या केल्यानंतर ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने घरापासून 400 ते 500 मीटर दूर अंतरावर जाऊन मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. पोलीस याप्रकरणी आई आणि वडिलांचाही सहभाग होता का याचाही तपास करत आहेत.