Union Budget 2023 : बजेटच्या भाषणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 'या' शब्दांचा अर्थ तुम्हाला माहितीये का?

Budget 2023 :  2023 – 2024 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये 1 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन हा अर्थसंकल्प सादर करणार आहे. 

Updated: Jan 11, 2023, 07:13 PM IST
Union Budget 2023 : बजेटच्या भाषणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 'या' शब्दांचा अर्थ तुम्हाला माहितीये का? title=

Budget 2023 : गेली अडीच वर्षे कोरोनाचे अभूतपूर्व संकट सोसल्यानंतर लवकरच आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान दरवर्षी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. 31 जानेवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार असून 8 एप्रिलला संपण्याची शक्यता आहे. 2023 – 2024 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये 1 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन हा अर्थसंकल्प सादर करणार आहे. 

अर्थमंत्री निर्मला सीतारमन पाचव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी 6 महिन्यांपासून तयारी केली जाते. अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी तरतूद केली जाते. यासोबत अर्थसंकल्पामध्ये अनेक गोष्टी किंवा तथ्ये आहेत ज्यांची तुम्हाला माहिती नसते. या अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात काही शब्द असे असतात ज्याचा सामन्यांना अर्थ कळत नाही. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान वापरल्या जाणाऱ्या या शब्दांचा काही अर्थ जाणून घेऊया....

अर्थसंकल्पीय अंदाज (Budget Estimates)

अर्थसंकल्पात प्रत्येक मंत्रालय आणि विभागासाठी आगामी वर्षासाठी अनेक योजना जाहीर केल्या जातात. अशा परिस्थितीत सरकार आपल्या खर्चाचे आणि आगामी वर्षाच्या कमाईचे जे काही अंदाज देते त्याला अर्थसंकल्पीय अंदाज (Budget Estimates) म्हणतात.

सुधारित अंदाज (Revised Estimates)

अर्थसंकल्पात करण्यात आलेला अंदाज 6 महिन्यांनंतर प्रत्यक्ष खर्चाचा विचार करून सुधारित केला जातो. त्यासाठी सरकारही आगामी काळात अर्थसंकल्पाचे अंदाज बदलते. याला सुधारित अंदाज म्हणतात.

वित्तीय तूट (Fiscal Deficit)

सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्न यातील फरक म्हणजे वित्तीय तूट. सरकारच्या एकूण उत्पन्न स्रोतापेक्षा सरकारी खर्च अधिक झाल्यास वित्तीय तूट निर्माण होते. तर सरकारचे सार्वजनिक उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत म्हणजे कराच्या मार्गाने आणि अन्य मार्गाने येणारा महसूल. सरकारची कमाई आणि खर्च यात नेहमीच फरक असतो.

महसुली तूट (Revenue Deficit)

सरकार दरवर्षी आपल्या कमाईचे लक्ष्यही ठरवते. जेव्हा सरकारचे उत्पन्न त्याच्या निर्धारित लक्ष्यापेक्षा कमी असते तेव्हा त्याला महसुली तूट म्हणतात

प्रत्यक्ष कर (Direct Tax)

सरकार एखाद्या व्यक्तीवर किंवा संस्थेवर तिच्या उत्पन्नावर जो कर लावते त्याला थेट कर म्हणतात.  आयकर,  मालमत्ता कर इत्यादींचा समावेश प्रत्यक्ष करात होतो.

अप्रत्यक्ष कर (Indirect Tax)

जेव्हा सरकार कोणत्याही वस्तू किंवा सेवांसाठी थेट जनतेकडून कर घेत नाही त्याला अप्रत्यक्ष कर म्हणतात. जीएसटी, कस्टम ड्युटी, सेवा कर इत्यादींचा समावेश अप्रत्यक्ष करात होतो.