Union Budget 2023 : सलग पाचव्यांदा अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला आहे. सामान्यांना सात लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कर (Tax) सवलतीचा मोठा दिलासा अर्थमंत्र्यांनी दिला आहे. यासोबत निर्मला सीतारमण यांनी श्री अन्न योजना, पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेसह अनेक योजनांची घोषणा केली. यासोबत अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक वाहनांना (EV) प्रोत्साहन देण्यावरही निर्मला सीतारमण यांनी भर दिला. मात्र, अर्थसंकल्प सादर करताना त्यांच्याकडून एक किरकोळ चूकही झाली, त्यामुळे संसदेचे वातावरण हलकं फुलकं झालं आणि सर्व खासदार हसू लागले. जुन्या भंगार वाहनांच्या धोरणात (Scrappage Policy) प्रोत्साहन देण्याची घोषणा करताना अर्थमंत्र्यांनी सर्व वाहने हटवण्यात येणार असल्याचे सांगितले. यावर सर्व खासदार हसायला लागले आणि अर्थमंत्र्यांनी स्वतःची चूक दुरुस्त केली.
नेमकं काय झालं?
प्रदूषण करणारी वाहने हटवण्याबाबत अर्थमंत्री सीतारमण बोलत असताना त्यांनी चुकून 'ओल्ड पॉलिटिकल व्हेहिकल' असा उल्लेख केला. त्याच वेळी विरोधी पक्षांच्या खासदाराने याकडे लक्ष वेधले. त्यानंतर सर्वजण हसू लागले. सीतारमण यांनी लगेच सॉरी म्हणत ती ओळ पुन्हा वाचली आणि चूक दुरुस्त केली. महत्त्वाचे म्हणजे निर्मला सीतारमण यांना 'ओल्ड पॉल्युटेड व्हेहिकल' असा उच्चार करायचा होता.
दुसरीकडे, वाहनांच्या स्क्रॅपिंगसाठी अधिक निधी दिला जाईल तसेच इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यात येईल. यासोबत जुन्या वाहनांवरील स्क्रॅपिंग धोरणांतर्गत लोकांनाही लाभ देण्यात येणार असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. ग्रीन ग्रोथ या संकल्पनेचाही अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात उल्लेख केला.