मोदी सरकारला धक्का, हरसिमरत कौर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.   

Updated: Sep 18, 2020, 06:52 AM IST
मोदी सरकारला धक्का, हरसिमरत कौर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

नवी दिल्ली : केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.  केंद्र सरकारने शेतकरीविरोधी विधेयके संसदेत मांडल्याच्या निषेधार्थ हरसिमरत कौर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. केंद्रातील मोदी सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. हरसिमरत कौर या शिरोमणी अकाली दलाच्या खासदार आहेत. नव्या विधेयकांमुळं पंजाबमधील शेतकऱ्यांनी गेल्या ५० वर्षांपासून जे कष्ट उपसले, त्यावर पाणी पडेल, अशी अकाली दलाची भूमिका आहे. 

शिरोमणी अकाली दलाचा एनडीएमध्ये हरसिमरत कौर बादल या एकमेव मंत्री आहेत. शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी लोकसभेमध्ये हरसिमरत कौर बादल यांच्या राजीनाम्याबाबत सांगितले. अकाली दल एनडीएमधला भाजपचा सगळ्यात जुना साथीदार आहे. दरम्यान, पंजाबच्या शेतकऱ्यांनी अन्नधान्याच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर करण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. पंजाबमध्ये सरकारने शेतीवर आधारित ढाचा तयार करण्यासाठीचे कठीण काम केले, पण हा अध्यादेश आपल्या ५० वर्षांचे काम संपवत असल्याची भीती सुखबीर सिंग बादल यांनी व्यक्त केली. 

कृषी उपज व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन आणि सुविधा) विधेयक २०२० आणि कृषी(सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन करार आणि कृषी सेवा कारार विधेयक २०२० वरच्या चर्चेत भाग घेताना सुखबीर सिंग बादल म्हणाले 'शिरोमणी अकाली दल शेतकऱ्यांचा पक्ष आहे आणि शेती संबंधी या विधेयकांचा आम्ही विरोध करतो.' लोकसभेमध्ये काँग्रेसने केलेल्या आरोपांना फेटाळून लावत आम्ही कधीही यू-टर्न घेतला नसल्याचेही सुखबीर सिंग बादल यांनी यावेळी सांगितले. आम्ही एनडीएमधले साथीदार आहोत. आम्ही सरकारला शेतकऱ्यांबाबतची भावना सांगितली. या विषयाला आम्ही प्रत्येक मंचावर उपस्थित केले. शेतकऱ्यांच्या शंका दूर व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न केले, पण तसे झाले नाही, असे वक्तव्य सुखबीर सिंग बादल यांनी केले.