सवर्ण जातीतील गरिबांना २५ टक्के आरक्षण द्या- रामदास आठवले

अॅट्रॉसिटीच्या कायद्यात आता कोणतेही बदल होणार नाहीत.

Updated: Sep 7, 2018, 08:32 PM IST
सवर्ण जातीतील गरिबांना २५ टक्के आरक्षण द्या- रामदास आठवले title=

लखनऊ: सवर्ण जातीमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना २५ टक्के आरक्षण मिळायला पाहिजे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी लखनऊ येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आठवले यांनी म्हटले की, सवर्ण जातीमधील गरीबांना आरक्षण देणारे विधेयक मंजूर झाले पाहिजे. सगळ्यांसाठीच हे फायदेशीर आहे. अन्यथा दलितांमुळे आपण आरक्षणाच्या हक्कापासून वंचित आहोत, असे सवर्णांना कायम वाटत राहील. सवर्णांना आरक्षण देण्यासाठी आरक्षणाची मर्यादा ५० वरुन ७५ टक्क्यांपर्यंत वाढवली पाहिजे, असा पर्याय आठवलेंनी सुचवला. 

तसेच हिवाळी अधिवेशनात सरकारने नोकऱ्यांमधील पदोन्नतीवेळच्या आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा, असेही आठवलेंनी म्हटले. याशिवाय, अॅट्रॉसिटीच्या कायद्यात आता कोणतेही बदल होणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला. समाजातील कोणत्याही घटकांवर या कायद्यामुळे अन्याय होणार नाही. त्यासाठी सवर्ण समाजाने दलितांविषयीचा दृष्टीकोन बदलला पाहिजे, असे आठवलेंनी म्हटले. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील चार जागांवर रिपाईचे उमेदवार असतील. यासाठी लवकरच भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार असल्याचेही आठवलेंनी सांगितले.