दुसऱ्यांच्या सभेला जाल तर, माझा शाप लागेल: भाजप मंत्री

काहीसे विक्षिप्त आणि अवैज्ञानिक विधान मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी केले आहे.

Updated: May 21, 2018, 11:07 AM IST
दुसऱ्यांच्या सभेला जाल तर, माझा शाप लागेल: भाजप मंत्री title=

बलिया: उत्तर प्रदेशमध्ये सत्तेवर असलेल्या भाजप सरकारमधील कँबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर हे तसे वादग्रस्तच व्यक्तिमत्व. नेहमी काहीतरी विचित्र विधाने करणे आणि वाद ओढवून घेणे किंवा चर्चेत राहणे ही त्यांची खासियत. सध्याही ते जोरदार चर्चेत आहेत. बलिया जिल्ह्यातील एका सभेत लोकांना संबोधित करताना त्यांनी भलतेच विधान केले आहे. 'जर कोणता व्यक्ती दुसऱ्या कुटल्या पक्षाच्या सभेला गेला तर, त्यांना मी शाप देईन. त्या लोकांना माझा शाप लागल्यावर त्यांना कावीळ होईल आणि ते गंभीर आजारी पडतील', असे काहीसे विक्षिप्त आणि अवैज्ञानिक विधान ओमप्रकाश राजभर यांनी केले आहे.

माझ्या औषधाशिवाय आजार बरा नाही होणार

सभेला संबोधित करत असतानाचा राजभर यांचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत राजभर महोदय हे विधान करताना दिसतात. या व्हिडिओत राजभर म्हणत आहेत की, 'तुम्ही लोक दुसऱ्या पक्षाच्या कोणत्या ना कोणत्या सभेत जालच. जोपर्यंत माझी टीम तुम्हाला घेऊन कोणत्या रॅलीत जात नाही तोपर्यंत तुम्ही कुठेही (रॅलीत) जायचे नाही. पण, तोपर्यंत जर कोणी दुसऱ्या पक्षाच्या सभेत गेला. तर, ध्यानात ठेवा त्या लोकांना माझा शाप लागेल. ते गंभीर आजारी पडतील. तुम्ही आता माझ्या सभेत आला आहात. कल्पना करा की, तुम्ही गंभीर आजारी पडला आहात. हा आजार राजभरच्या औषधाशिवाय बराही होणार नाही.'

योगी सरकारवर राजभर नाराज

दरम्यान, गेल्य काही दिवसांपासून राजभर हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. योगी आदित्यनाथ हे त्यांच्याबाबत भेदभाव करत असल्याचा आरोपही राजभर यांनी केला होता.