Maid Mixes Urine In Food : पिठात लघवी मिसळून एक मोलकरणी घरमालकाच्या कुटुंबियांना त्या चपात्या जेवणात खायला देत असल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला. उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबादमध्ये (Gaziabad) हा प्रकार घडला होता. मालकाने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या मोलकरणीला अटक केली आहे. पोलीस तपासात मोलकरणीने असं का करत होती याचं अजब कारण दिलं आहे. संशयावरुन घरमालकाने स्वयंपाकघरात सीसीटिव्ही लावल्यानंतर हा प्रकार समोर आला.
काय घडलं होतं नेमकं?
उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबादमध्ये क्रॉसिंग रिपब्लिक भागातील एका सोसायटीत राहाणाऱ्या रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या कुटुंबातील सदस्य गेल्या काही महिन्यापासून गंभीर आजाराने त्रस्त होते. कुटुंबातील सदस्यांमध्ये पोटाचे विकार आणि लिव्हरच्या समस्या वाढू लागल्या. सुरुवातीला साधारण आजार असल्याचं समजत त्यांनी दुर्लक्ष केलं. पण पोटाच्या विकाराची समस्या वाढत गेली. त्यामुळे जेवणात काहीतरी गडबड असल्याचा संशय त्यांना आला.
स्वंयपाकघरात लावला सीसीटीव्ही
रीना नावाच्या मोलकरणीवर त्यांचा संशय होता. संशयानंतर घरमालकाने स्वंयपाकघरात सीसीटीव्ही (CCTV) लावला. सीसीटीव्हीतलं फुटेज पाहिल्यानंतर घरातील लोकांना मोठा धक्का बसला. मोलकरीण चपातीच्या पिठात लघवी मिसळायची आणि त्याच्या चपात्या बनवायची. या चपात्या कुटुंबातील सदस्यांना ती जेवणात कखायला द्यायची. मोलकरीण लघवी एका भांड्यात जमा करुन पिठात टाकत होती. हा किळसवाणा प्रकार समोर आल्यानंतर घर मालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आठ वर्ष काम करत होती मोलकरीण
ही मोलकरीण तब्बल आठ वर्ष या घरात काम करत होती. पोलिसांनी अटक केल्यानंतर असं करण्यामागचं कारण विचारलं. यावर तीने अजब उत्तर दिलं. घरमालक सारखा आपल्यावर लक्ष ठेऊन असायचा, लहान-सहान गोष्टींवरुन बडबडायचा. त्यामुळे रागातून आपण हे कृत्य केल्यांच मोलकरणीने सांगितलं.
कुटुंबियांना पोटाच्या विकाराने त्रस्त
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून युजर्सने या मोलकरणीच्या कृत्यावर संपात व्यक्त केला आहे. या मोलकरणीला कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात येतेय.