महापालिकेच्या ऑफिसमध्ये हेल्मेट घालून काम करतायत कर्मचारी! समोर आलं धक्कादायक कारण

UP News : कार्यालयात हेल्मेट घातलेल्या कर्मचाऱ्यांचा फोटो व्हायरच झाल्यानंतर त्याची एकच चर्चा सुरु झाली आहे. महापालिकेच्या कार्यालयातील या व्हायरल फोटोंचे सत्य अखेर समोर आलं आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 23, 2023, 03:32 PM IST
महापालिकेच्या ऑफिसमध्ये हेल्मेट घालून काम करतायत कर्मचारी! समोर आलं धक्कादायक कारण title=

UP News : उत्तर प्रदेशच्या (UP) लखनऊमधील (lucknow) एका कार्यालयातील फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल फोटोमध्ये सरकारी कार्यालयातील कर्मचारी काम करताना हेल्मेट (helmet) घालून बसल्याचे दिसून येत आहे. लखनऊमधील या कार्यालयाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लखनऊच्या महापालिकेचे हे कार्यालय असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालून काम करावे लागण्याचे कारणही समोर आले आहे.

लखनऊमध्ये मुसळधार पावसामुळे महापालिका कार्यालयाचे छतच कोसळून मोठे नुकसान झाले आहे. अचानक छतावरून वीट आणि प्लास्टर पडल्याने कार्यालयात एकच खळबळ उडाली होती. महत्त्वाची बाब म्हणजे घटना घडली त्यावेळी एकही कर्मचारी तिथे उपस्थित नव्हता. मात्र आता कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालूनच काम करावे लागत आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

माध्यमांच्या वृत्तानुसार, हा सगळा प्रकार अलीगंजच्या कपूरथला भागात असलेल्या लखनऊ महानगरपालिका इमारतीत घडला आहे. ही इमारत 40 वर्षे जुनी असल्याची माहिती समोर आली आहे. 22 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर आधी छतावरून पाणी कार्यालयात पडत होते. त्यानंतर कार्यालयाच्या कॅश काउंटरच्या वरचे सिलिंगचे प्लास्टर अचानक खाली पडले. काही वेळाने कॉम्प्युटर कक्षाच्या छताचेही प्लास्टर व काही विटा त्यासोबत खाली पडल्या. त्यामुळे जमिनीवरील फरशाही तुटल्या होत्या.

घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी व अभियंते घटनास्थळी दाखल झाले. कार्यालयाच्या छतावरून यापूर्वी अनेकदा प्लास्टर पडल्याचे समोर आल्याची तक्रारही करण्यात आली होती. मात्र त्याची दुरुस्ती कधीच झाली नाही.

म्युनिसिपल कॉर्पोरेशन एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंद वर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कार्यालयाच्या दुरवस्थेबाबत आपण महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे. याबाबत 10 जुलै रोजी पत्रही दिले होते, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. दुरुस्तीच्या मागणीसोबतच कर्मचाऱ्यांसाठी खुर्च्या, टेबल, स्टेशनरी, वॉटर कुलर, पंखे बसवण्यास सांगण्यात आले होते.

दरम्यान, कार्यालयात नूतनीकरणाचे काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल, असे अधिकारी आलोक श्रीवास्तव यांनी सांगितले. दरम्यान, महापालिका मुख्यालयात बांधण्यात आलेल्या आर्ट गॅलरीतही फॉल्स सिलिंग पडल्याची घटना समोर आली आहे. पावसाळ्यात तिथे पाणी मुरायचे, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेल्याने हा सगळा प्रकार घडला आहे.