राम मंदिर भूमिपुजनानंतर अयोध्येत जागांचे दर गगनाला भिडले

अयोध्या नगरीकडे साऱ्या जगाच्या पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे

Updated: Sep 22, 2020, 11:47 AM IST
राम मंदिर भूमिपुजनानंतर अयोध्येत जागांचे दर गगनाला भिडले   title=
संग्रहित छायाचित्र

अयोध्या: बहुप्रतिक्षित अशा अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरासाठीचं भूमीपुजन संपन्न झाल्यानंतर Ayodhya अयोध्येमध्ये खऱ्या अर्थानं दिवस पालटल्याचं पाहायला मिळालं. याचाच प्रत्यय आला, अयोध्या नगरीकडे साऱ्या जगाच्या पाहण्याच्या बदललेल्या दृष्टीकोनातून, शिवाय येथील भूखंडांच्या दरातून. 

ऑगस्ट महिन्यात अयोध्येमध्ये राम मंदिर भूमीपुजन पार पडल्यानंतर अवघ्या एका महिन्याच्या कालावधीतच येथील भूखंडाचे दर दुपटीनं वाढले आहेत. सर्वोच्च न्यायालयानं सदर खटल्यातील ऐतिहासिक निर्णयाची सुनावणी केल्यानंतरच्या काळापासूनच अय़ोध्येतील भूखंडांच्या दरांमध्ये जवळपास ३०-४० टक्क्यांची वाढ झाल्याचं निरिक्षण केलं गेलं. 

फक्त अयोध्याच नव्हे, तर त्या आजुबाजूच्या परिसरातही भूखंडाचे दर, प्रति चौरस फूटामागे १०००-१५०० रुपयांनी वाढले. तर, मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या जागांच्या दरात प्रति चौरस फूट तब्बल ३००० हून अधिक रुपयांची मोठी वाढ झाल्याचं वृत्तं आहे. इथं लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे या भागात सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपूर्वी भूखंडांचे दर जवळपास प्रति चौरस फूट ९०० रुपयांच्या घरात होते. 

 

भारतातील एका अतिशय महत्त्वाच्या शहरांच्या निर्माणासाठी आश्वासन देत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या तीन मोठे भव्य प्रकल्प, थ्री स्टार हॉटेल आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या घोषणांच्या पार्श्वभूमीवर भूखंडांच्या दरांत ही लक्षणीय वाढ होत असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, अयोध्या प्रकरण निकालात निघण्यापूर्वी मात्र येथे चित्र बऱ्याच अंशी वेगळं होतं. किंबहुना राजकीय तणावाची परिस्थिती पाहता या भागात गुंतवणुकीलाही फारसा वाव नव्हता. पण, आता मात्र खऱ्या अर्थानं हे चित्र पालटलं आहे.