विद्यार्थिनीचा दुपट्टा खेचला, तुम्ही काय आरोपींची आरती काढत होतात का?; योगी आदित्यनाथ SP वर संतापले

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकताच राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी आंबेडकर नगर येथे एका विद्यार्थिनीचा दुपट्टा खेचल्या जाण्याच्या प्रकरणात पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या उत्तरावर ते नाराज झाले आणि खडे बोल सुनावले.   

शिवराज यादव | Updated: Sep 26, 2023, 04:06 PM IST
विद्यार्थिनीचा दुपट्टा खेचला, तुम्ही काय आरोपींची आरती काढत होतात का?; योगी आदित्यनाथ SP वर संतापले title=

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकताच राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आलेली ही सर्वात मोठी बैठक ठरली. जवळपास 3 तास 15 मिनिटं सुरु असलेल्या या बैठकीत महिलांसंबंधी गुन्हे, गुन्हेगारी नियंत्रण, त्यांच्याविरोधातील कारवाई हे चर्चेचे मुख्य मुद्दे होते. यादरम्यान महिलांविरोधातील गुन्ह्यांमधील आरोपींविरोधात कारवाई करण्यात असमर्थ राहिल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नाराजी जाहीर केली. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या प्रमुखांना खडे बोलही सुनावले. 

योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या बैठकीत पहिल्यांदाच पोलीस महासंचालक, अतिरिक्त महासंचालक, पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलीस ठाण्यांचे प्रमुखही हजर होते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना ओरडा पडत असताना कनिष्ठ अधिकारीही ऐकत होते. यावेळी सर्वाधिक चर्चा आंबेडकर नगरमध्ये एका विद्यार्थिनीचा दुपट्टा खेचलेल्या घटनेची होती. या घटनेवरुन मुख्यमंत्र्यांनी आंबेडकर नगर पोलीस अधिक्षकांना खडे बोल सुनावले. 

योगी आदित्यनाथ यांनी आंबेडकर नगरसह इतर गुन्हेगारी घटनांवरही भाष्य करत पोलीस अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी जाहीर केली. यावेळी त्यांनी पोलीस आयुक्तांनाही सोडलं नाही. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलं आहे की, जर एखाद्या घटनेत दुर्लक्षपणा किंवा गडबड झाल्याचं दिसलं तर त्याला फक्त निलंबित केलं जाणार नाही तर जबरदस्ती सेवानिवृत्ती घेण्यास भाग पाडलं जाईल. 

मुख्यमंत्र्यांच्या नाराजीमागे नुकतीच घडलेली एक घटना कारणीभूत ठरली. आंबेडकर नगरमध्ये एका विद्यार्थिनीचा दुपट्टा खेचल्याप्रकरणी आरोपींवर कारवाई करण्यात उशीर केल्याने ते नाराज होते. यावेळी त्यांनी पोलीस अधिक्षकांकडे संताप व्यक्त करत, जर तुम्हाला सरकारने आदेश दिले नसते तर काय आरोपींना मिठाई भरवली असती का? त्यांची आरती काढली असती का? अशी विचारणा केली. जिल्ह्यात काय सुरु आहे हे मला माहिती आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं. 

मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकीत आंबेडकर नगर पोलिसांनी कारवाईत उशीर केल्याचा अनेकदा उल्लेख केला. पुन्हा असा उशीर होता कामा नये, अन्यथा कडक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. खुर्ची तर जाईलच, पण खात्यातूनही बाहेर काढलं जाईल असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. 

आंबेडकर नगरनंतर मुख्यमंत्र्यांनी हाथरसच्या जिल्हा प्रमुखांना धारेवर धरलं. गोहत्या कशी काय होत आहे? असं विचारण्यात आलं असता पोलीस अधिक्षकांनी फक्त 30 किलो गोमांस नेलं जात होतं असं उत्तर दिलं. हे उत्तर ऐकल्यानंतर योगी आदित्यनाथ संतापले. गोमांसाची तस्करी होत आहे, म्हणजे गोहत्या केली जात आहे असं सांगत योगी आदित्यनाथ यांनी ते रोखण्याचे निर्देश दिले.