Schools New Order : विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत (Zilla Parishad School) शिक्षिकेला मॅडम नाही तर दीदी म्हणायचं तर सरांना गुरुजी म्हणायचं असे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशमधल्या संभल जिल्ह्यातील शाळांमध्ये ही नवी प्रथा सुरु करण्यात आली आहे. संभल जिल्ह्यातील शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचं पालन करण्याचे निर्देश (Sambhal Schools New Order) दिले आहेत. यानुसार मॅडम ऐवजी दीदी किंवा बहन असं म्हणायचं. तर पुरुष शिक्षकांना गुरुजी शब्दाचा वापर करायचा. तसंच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी आणि शिक्षकांनी नमस्ते किंवा जयहिंद (Jai Hind) म्हणण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
जिल्हा परिषद शाळेत नवा नियम
संभल जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी अलका शर्मा यांनी ही माहिती दिली आहे. प्राचीन संस्कृतीची ओळख नव्या पिढीला व्हावी यासाठी हे प्रयत्न सुरु असल्याचं अलका शर्मा यांनी म्हटलंय. यामुळे मुलांमध्ये शिक्षकांबद्दल आदर वाढेल असा दावा त्यांनी केला आहे. इतकंच नाही तर शाळेची पाहणी करण्यासाठी येणारे अधिकारी देखील शाळेतील शिक्षिकांना दीदी, बहन आणि शिक्षकांना गुरुजी या नावाने बोलवतील, असे निर्देशही त्यांनी दिलेत.
नमस्ते किंवा जय हिंद
याशिवाय शाळेत शिकणारे विद्यार्थी आणि शिक्षक यापुढे एकमेकांना नमस्ते किंवा जयहिंद म्हणतील. जय हिंद म्हटल्याने विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत होईल. तसंच विद्यार्थ्यी देशाबाबत विचार करु शकतील असंही शिक्षण अधिकारी अलका शर्मा यांनी सांगितलं.
पान, सिगरेट,तंबाखूवर बंदी
याशिवाय शाळेच्या वेळेत कोणत्याही शिक्षकाने पान, सिगारेट, तंबाखू यांचं सेवन करु नये, व्यसन करताना कोणी आढळलंच तर त्या शिक्षकाविरुद्ध कठोर कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. इतकंच नाही तर संभलमधल्या जिल्हा परिषद शाळेत प्लास्टिक बाटल्यांवरही बंदी घालण्यात आली आहे. शाळेत कोणी प्लास्टिक बाटलीचा वापर केल्यास त्यावर आर्थिक दंड ठोठावला जाईल असे निर्देशही देण्यात आलेत.
जीन्स-टीशर्टवर बंदी
जिल्हा परिषद शाळेत यापुढे कोणत्याही पुरुष किंवा महिला शिक्षकांनी जीन्स आणि टीशर्ट परिधान करु नयेत असे निर्देशही देण्यात आलेत. भारतीय पेहरावात शाळेत येण्याची परवानगी असेल. शाळा हे मंदिरासारखे आहे, त्यामुळे आपण मंदिरात जे आचरण करतो ते शाळेतही पाळले पाहिजे, असं शिक्षण अधिकारी अलक शर्मा यांनी सांगितलं. वर्गात शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी बूट किंवा चप्पल घालून प्रवेश करु नये, वर्गाबाहेर बूट किंवा चप्पाल काढून ठेवण्यासही सांगण्यात आलं आहे.