IIT KANPUR : IIT कानपूरचे माजी विद्यार्थी आणि इंडिगो एअरलाइन्सचे सह-संस्थापक राकेश गंगवाल यांनी संस्थेला आतापर्यंतची सर्वात मोठी खाजगी देणगी दिली आहे. राकेश गंगवाल यांनी IIT मध्ये बांधल्या जाणाऱ्या स्कूल ऑफ मेडिकल रिसर्च अँड टेक्नॉलॉजीच्या बांधकामासाठी तब्बल 100 कोटींची देणगी दिली आहे. यापूर्वी जेके सिमेंट समूहाने 60 कोटींचा निधी दिला होता.
आयआयटी कानपूरचे संचालक प्रा. अभय करंदीकर यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. या देणगीमुळे एसएमआरटीच्या कामाला गती मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याअंतर्गत संस्थेत मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलही सुरू करण्यात येणार आहे. आयआयटी कानपूरमध्ये सुरू होणाऱ्या स्कूल ऑफ मेडिकल रिसर्च अँड टेक्नॉलॉजीमध्ये आता अभियांत्रिकीसोबतच वैद्यकीय क्षेत्राच्या उपयुक्ततेनुसार वैद्यकीय अभ्यास आणि संशोधन केलं जाणार आहे.
अभ्यास आणि संशोधनासोबतच विविध गंभीर आजारांवर उपचारही केले जाणार आहेत. संस्थेच्या तयारीसाठी संचालकांनी माजी विद्यार्थ्यांची मदत घेतली आहे. ज्यामध्ये आतापर्यंत माजी विद्यार्थी मुकेश पंत आणि हेमंत जालान यांनी प्रत्येकी 18 कोटी, डॉ. देव जोनेजा यांनी 19 कोटी, आरईसी फाउंडेशनने 14.4 कोटी आणि जेके ग्रुपने 60 कोटींची देणगी दिली आहे.
प्रा. अभय करंदीकर यांनी सोमवारी मुंबईत इंडिगो एअरलाइन्सचे सहसंस्थापक राकेश गंगवाल यांची भेट घेतली. राकेश गंगवाल यांनी 1975 साली संस्थेतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक केलं होतं. प्रोजेक्ट ऐकून राकेशने त्याच्या इन्स्टिट्यूट आयआयटी कानपूरला 100 कोटी रुपये देणगी दिली.
एक हजार एकरमध्ये एसएमआरटीचं बांधकाम
आयआयटी कानपूरमध्ये सुमारे 1000 एकरमध्ये SMRT चं बांधकाम होणार आहे. ज्यामध्ये 247 एकरमध्ये हॉस्पिटल असणार आहे. त्याच्या रचनेसाठी हेल्थकेअर मॅनेजमेंट आणि हॉस्मॅक कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. येथे नवीन औषधांवर संशोधन करून रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.
या विषयांचा अभ्यासक्रम शिकवणार
पहिल्या टप्प्यात कार्डिओलॉजी, कार्डिओथोरॅसिक, यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी, सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी आणि ऑन्कोलॉजी यासह अनेक पीजी अभ्यासक्रम शिकवले जातील. न्यूरोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, लिव्हर, किडनी आणि कॅन्सर यांसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी इंजिनीअरिंगच्या मदतीने उपकरणेही इथं विकसित केली जाणार आहेत.