उत्तराखंडचे (Uttarakhand) मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत (Trivendra Singh Rawat) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी राज्यपाल बेबी रानी मोर्या यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता.
आता उत्तराखंडची धुरा कुणाकडे जाणार याचा सस्पेन्स कायम आहे, मात्र बुधवारी म्हणजे उद्याच भाजप (BJP) नव्या मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर करेल असं कळतंय. उद्या भाजपची यासंदर्भात बैठकही होणार आहे.
राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आता दुसऱ्याला मिळायला हवी, असं पक्षाचं मत आहे. मी या पदावर कधी विराजमान होईन, याचा मी विचारही केला नव्हता. मात्र भारतीय जनता पक्षाने मला ही संधी दिली. असं केवळ भाजपमध्येच होऊ शकतं, अशी प्रतिक्रिया त्रिवेंद्र सिंह रावत यांनी दिली आहे.
आमदार धन सिंह रावत, खासदार अनिल बलूनी आणि प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांची नावं मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. 2000 मध्ये उत्तराखंड राज्याची स्थापना झाल्यानंतर काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी यांच्या व्यतिरिक्त एकानेही मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही.
2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत (2017 Uttarakhand Assembly Elections) भाजपला 70 पैकी 57 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसला 11 तर अपक्षांना 2 जागांवर समाधान मानावं लागलं. यानंतर त्रिवेंद्र सिंह रावत यांना भाजपने मुख्यमंत्री केलं. आता 2022मध्ये उत्तराखंड विधानसभेची निवडणूक होईल.