उत्तराखंडातील एक थरारक सुटका

तो एक फोन कॉल ठरला महत्वाचा 

Updated: Feb 10, 2021, 08:44 AM IST
उत्तराखंडातील एक थरारक सुटका  title=

मुंबई : आता बातमी 'जिंदगी मिलेगी दोबारा'ची.  उत्तराखंडच्या (Uttarakhand) प्रलयात त्यांच्या जगण्याच्या सगळ्या आशा संपल्या होत्या. सगळं संपलं असं वाटत असताना एकाच्या मोबाईलला रेंज दिसली.  आणि जगण्याची उमेद परत आली. कशी जिंकली बोगद्यात अडकलेल्या लोकांनी जगण्याची लढाई..

हा आनंद आहे आपण एक जीव वाचवला याचा. उत्तराखंडमधला प्रलय धडकी भरवणारा आणि प्रचंड विध्वंसक होता. अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत. महाभयानक प्रलय आला, त्यावेळी तपोवन बोगद्यात काही मजूर काम करत होते. हिमकडा कोसळला, धरण फुटलं.  पाण्याच्या रस्त्यात जे जे सापडेल, त्याला उध्वस्त करत पाणी पुढे सरकत होतं. तेच पाणी या बोगद्यात शिरलं.  बोगद्यातले मजूर बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते.  पण पुन्हा पुन्हा माती, पाणी, बर्फ अंगावर येऊन आदळत होतं.... 

 बोगद्यात अडकलेले लोक ओरडत होते, मदत मागत होते पण जगण्याची आशा धूसर होत होती. आता सगळं संपलं असं वाटत असतानाच आशेचा एक किरण दिसला. एका मजुराच्या मोबाईलला रेंज आली. आणि त्यानं त्याच्या साहेबांना फोन केला. आम्हाला वाचवा आम्ही अडकलो आहे. पटापटा चक्रं फिरली. आयटीबीपीच्या जवानांनी ते ठिकाण गाठलं आणि जगण्या-मरण्याची ही लढाई १६ मजुरांनी जिंकली.

बोगद्यात आठ तास मजूर अडकून पडले होते. मोबाईलवर आलेल्या सिग्नलनं बरेच जीव वाचवले...... जे सुखरुप बाहेर आले, त्यांचा जिंदगी मिलेगी दोबारावरचा विश्वास आणखी घट्ट झाला.