देशासाठी आजचा दिवस ऐतिहासिक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं कारण

कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताने मोठा टप्पा पार केला आहे

Updated: Jan 7, 2022, 05:32 PM IST
देशासाठी आजचा दिवस ऐतिहासिक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं कारण title=

Vaccination in India : कोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरण हे प्रभावी अस्त्र आहे. देशभरात लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. भारताने आज कोरोना लसीकरणाच्या बाबतीत एक मोठा टप्पा गाठला आहे. देशात आतापर्यंत 150 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. 

शुक्रवारी दुपारपर्यंत भारताने हा ऐतिहासिक टप्पा ओलांडला. यासोबतच देशातील 62 कोटींहून अधिक लोकांना पूर्ण लसीकरण करण्यात आलं आहे.

पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन
या ऐतिहासिक कामगिरीबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देशाने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.  वर्षाची सुरुवात १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाने झाली. आणि आज, वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, भारताने 150 कोटी लसीचा ऐतिहासिक टप्पाही गाठला आहे.

150 कोटी लसीचे डोस तेही एका वर्षापेक्षा कमी कालावधीत, ही आकडेवारीनुसार मोठी संख्या आहे. जगातील बहुतांश देशांसाठी हे आश्चर्यापेक्षा कमी नाही. भारतासाठी, हे नवीन इच्छाशक्तीचे प्रतीक आहे, अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी काहीही करण्याची हिंमत आहे, अशा शब्दात पंतप्रधानांनी कौतुक केलं आहे.

आतापर्यंत किती लसीकरण
देशातील 87 कोटी 9 लाखांहून अधिक लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्याच वेळी, 62 कोटी 10 लाखांपेक्षा जास्त दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 वर्षांवरील 34 कोटी 98 लाख लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

दोन करोड मुलांचं लसीकरण
देशात किशोरवयीन मुलांचे लसीकरणही वाढत आहे. आतापर्यंत, 20 दशलक्षाहून अधिक मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. 3 जानेवारीपासून किशोरवयीन मुलांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली.