Company Announces Fifth Interim Dividend: देशामधील खानउद्योगामधील आघाडीच्या कंपनींपैकी एक असलेल्या वेदांता लमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला मोठी भेट दिली आहे. कंपनीने चक्क पाचव्यांदा डिव्हिडंट देण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात कंपनीने स्टॉक एक्सचेंजला कळवलं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक शेअरमागे कंपनी शेअर होल्डरला 20.50 रुपयांचं डिव्हिडंट देणार आहे. कंपनीने केलेल्या घोषणेमुळे 1 रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या आधारावर प्रत्येक शेअरमागे डिव्हिडंट 20.50 रुपये इतका मिळेल. शेअर होल्डर्सला डिव्हिडंट देण्यासाठी कंपनी एकूण 7,621 कोटी रुपये देणार आहे.
विशेष म्हणजे सध्याच्या आर्थिक वर्षामध्ये यापूर्वी वेदांता लमिटेडने शेअर होल्डर्सला तब्बल 4 वेळा डिव्हिडंट दिलेला आहे. आतापर्यंत या 4 भागांमधून कंपनीने प्रत्येक शेअर्समागे जवळजवळ 81 रुपयांचा नफा वितरित केला आहे. आता कंपनीने पाचव्यांदा डिव्हिडिंटची घोषणा केल्याने गुंतवणूकदारांनामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, डिव्हिडंटची रक्कम देण्यासाठी रेकॉर्ड डेट ही 7 एप्रिल 2023 पर्यंत असेल. म्हणजेच 7 एप्रिलपर्यंत कंपनीच्या रेकॉर्डमध्ये ज्या गुंतवणूकदारांच्या नावावर शेअर्स आहेत त्यांना प्रत्येक शेअरमागे 20.50 रुपये लाभ मिळणार आहे. डिव्हिडंटची रक्कम निर्धारित वेळेच्या आत केली जाणार आहे.
6 मे 2022 रोजी वेदांताना प्रत्येक शेअरमागे 31.50 रुपये अंतरिम डिव्हिडंट देण्याची घोषणा केलेली. त्यानंतर लगेच 26 जुलै रोजी कंपनीने 19.50 रुपये प्रति शेअर लाभ दिला होता. पुन्हा त्याच वर्षी 29 नोव्हेंबर रोजी 17.50 पैशांचा डिव्हिडंट दिला होता. त्यानंतर नवीन वर्ष सुरु झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी कंपनीने 12.50 रुपये प्रति शेअर अंतरिम डिव्हिडंट दिलेला.
वेदांत ही भारतामध्ये सर्वाधिक डिव्हिडंट देणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर प्रती शेअर 275.50 रुपये दराने या कंपनीचे शेअर्स उपलब्ध आहेत. कंपनीने आपले कार्यकारी मुख्य वित्तिय अधिकारी (सीएफओ) अजय गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची घोषणाही केली. त्यांच्या जागी अद्याप नवी नियुक्ती झालेली नाही. नव्या सीएफओची घोषणा लवकरच केली जाईल असं सांगण्यात आलं आहे.