'मी शिकलेली आहे, स्वत:चे निर्णय घेऊ शकते' मुलीच्या उत्तराने वडीलांची सटकली, थेट रायफलच काढली आणि...

वडिल आणि मुलीत भांडण झालं, शब्दाला शब्द वाढत गेला. मुलीने मी शिकलेलो आहे, नोकरी करते आणि स्वत:चे निर्णय घेऊ शकते असं वडिलांना ऐकवलं. मुलीचं उत्तर ऐकून वडीलांचा संताप अनावर झाला, त्यांनी थेट राफयलने मुलीवर गोळी झाडली.

Updated: Mar 28, 2023, 07:24 PM IST
'मी शिकलेली आहे, स्वत:चे निर्णय घेऊ शकते' मुलीच्या उत्तराने वडीलांची सटकली, थेट रायफलच काढली आणि...

Trending News : सरकारी कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या एका प्राध्यापकाने स्वत:च्या मुलीला गोळ्या घालून संपवल्याची (Father kills Daughter) धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीची हत्या केल्यानंतर वडीलांनीही आत्महत्या केली. मुलीला लव्ह मॅरेज (Love Marriage) करायचं होतं, पण वडीलांचा तीव्र विरोध होता. यातूनच ही दुर्देवी घटना घडल्याचं बोललं जात आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

काय आहे नेमकी घटना?
उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) जनपद कासगंजमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. नरेंद्र सिंह यादव हे आपल्या कुटुंबासह कासगंज शहरातील पॉश कॉलनीत राहात होते. नरेंद्र सिंह हे एका कॉलेजमध्ये फिजिक्स विषयाचे प्राध्यापक (Lecturer) होते. नरेंद्र सिंह यांच्या कुटुंबात पत्नी शशि, मुलगी जुही आणि एक मुलगा आहे. मुलगी कासगंज जिल्ह्यातील एका शाळेत प्रायमरी स्कूल टीचर होती, तर मुलगा दहावीच्या परीक्षेची तयारी करतोय.

मुलीला करायचं होतं लव्ह मॅरेज
नरेंद्र सिंह यांची मुलीग जुही हिचं एका मुलाबरोबर प्रेमप्रकरण होतं, आणि त्याच्याबरोबरच तिला लग्न करायचं होतं. पण या गोष्टीला वडिलांचा तीव्र विरोध होता. या गोष्टीवरुन दोघांमध्ये भांडणं होत होतं. वडिलांनी तिला अनेकवेळा समजवण्याचा प्रयत्न केला. पण जुही आपल्या मतावर ठाम होती. यावरुनच दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण झालं. यावेळी मुलीने माझे निर्णय मी स्वत: घेण्यास समर्थ आहे, मी स्वत: कमवते आणि स्वत:च्या पायावर उभी आहे असं उत्तर दिलं.

वडीलांचा संताप अनावर
मुलीचं उत्तर ऐकून वडीलांचा संताप अनावर झाला. त्यांनी आपल्याकडे परवाना असलेली रायफल काढली आणि मुलीच्या दिशेने गोळी झाडली. मुलीने रायफलच्या नळकांडीवर हात ठेवला, पण गोळी हातातून थेट तिच्या छातीत घुसली आणि जागेवरच ती कोसळली. मुलीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिल्यानंतर वडीलांनी त्याच रायफलने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. अचानक घडलेल्या या घटनेने पत्नी आणि मुलाने आरडाओरडा  केला. त्यानंतर आसपासची लोकं तिथे जमा झाली, त्यांनी नरेंद्र सिंह आणि जुहीला तात्काळ रुग्णालयात भरती केलं. पण उपचाराआधीच दोघांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा : ऐकावं ते नवलच! पाळलेला पोपट उडून गेला, कुटुंबाने अन्नत्याग केला, मुलीने शिक्षण सोडलं... शहरभर लावले पोस्टर्स

पोलीस घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेंसिक टीम घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोनही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले. नरेंद्र सिंह यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी जुहीचे एक मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. समाजात बदनामी होईल या विचाराने नरेंद्र सिंह तणावात होते. तर नरेंद्र सिंह यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी लग्नाच्याच गोष्टीवरुन वडील आणि मुलीत वाद सुरु झाला. मुलगी ऐकत नसल्याने वडीलांनी तिला मारहाणही केली होती. पण वाद वाढत गेल्याने नरेंद्र सिंह यांनी मुलीची हत्या करुन आत्महत्या केली.