close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांना दणका

 काँग्रेस आणि जेडीएसला मोठा दिलासा 

Updated: Jul 22, 2019, 03:21 PM IST
कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांना दणका

बंगळुरु : कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांना दणका बसला आहे. कर्नाटक विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी आमदारांना व्हीप बजावण्याचा अधिकार संबंधित पक्षाचा असल्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे काँग्रेस आणि जेडीएसला मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयानं बंडखोर आमदारांना व्हीप बाजावण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं होतं. त्यावर सभागृहात पॉईंट ऑफ ऑर्डरने काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी व्हीप बाजावण्याचा अधिकार पक्षाचा आहे की नाही, हे स्पष्ट करावे अशी मागणी अध्यक्षांकडे केली होती. त्यावर अध्यक्षांनी हा निर्णय दिलाय.

विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयामुळे काँग्रेस आणि जेडीएसच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावर आजच मतदान घेण्यासंदर्भात भाजाला पाठिंबा दिलेल्या दोन अपक्षांची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेसंदर्भात आजच सुनावणी घ्या अशी मागणी करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं या अर्जावर तात्काळ निर्णय घेता येणार नाही. उद्या आपण या संदर्भात निर्णय देऊ असं सांगितलं आहे.

दरम्यान भाजपा नेते अनेक आमदारांना पैसे आणि मंत्रिपदाचे अमिश दाखवत असल्याचा आरोप काँग्रेस आमदार कृष्णा भयरेगोडा यांनी केलाय. आपल्याकडे पुरावे असून ते सभागृहात द्यायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भाजप नेत्यांनी मात्र यावर सभागृहात चर्चा करण्यास आक्षेप घेतला आहे. पुरावे असतील तर पोलिसांत द्या मात्र सभागृहात चर्चा नको असा पवित्रा भाजपनं घेतला आहे. 

जे आमदार सभागृहात नाहीत त्यांच्यावर सभागृहात आरोप करणं चुकीचं असल्याची भाजप आमदारांची भूमिका आहे. मात्र भाजप आमदारांच्या भूमिकेनंतर विधानसभा अध्यक्ष भडकले. त्यांना सभागृहात उपस्थित राहायला कोणी नाकारलं का? सभागृहातील सदस्यांबाबत असणारा विषय सभागृहाच चर्चा व्हायला हवी तसंच तुमच्याकडे पुरावे असतील तर ते मला द्या. विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेस आमदार कृष्णा भयरेगोडा यांना आदेश दिले आहेत. संध्याकाळी पाच पर्यंत पेन ड्राईव्हमधून पुरावे सादर करणार असल्याचं भयरेगोडांनी म्हटलं आहे.